मुक्तपीठ टीम
शिवसेनेत झालेल्या बंडाळीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. मराठवाड्यातील शिवसेनेच्या अनेक लोकप्रतिनिधींनी बंडखोरी केल्यानंतर आता उद्धव ठाकरे गटातून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे खिंड लढवत आहेत. त्यामुळेच, अंबादास दानवे यांना शिवसेनेने मोठी जबाबदारी दिली आहे. विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवेंची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून त्याबाबात अधिसूचना काढण्यात आली आहे.
अंबादास दानवे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते!!
- विधान परिषदेत विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष म्हणून विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचा सदस्य नेमावा असे पत्र उपसभापती नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेकडून देण्यात आले होते.
- त्यानंतर अंबादास दानवे यांच्या नावाची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी नियुक्ती करण्यात यावी अशी शिफारस करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पत्र सोमवार, ८ ऑगस्ट रोजी शिवसेना उपनेते अरविंद सावंत यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना सुपूर्द केले होते.
- त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी दुपारी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर केले.
- याविषयीचे राजपत्रही रात्री प्रसिद्ध करण्यात आले.
- विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल उपसभापती नीलम गोर यांनी अंबादास दानवे यांची निवड झाल्याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
अरविंद सावंतांनी दिली माहिती…
- शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी सोमवारी अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्ष पदासाठी निवड करण्यात आल्याची माहिती दिली होती.
- त्यावर आज अधिकृत शिक्कामोर्तब झालं आहे.
- अरविंद सावंत म्हणाले होते की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार विधान परिषदेच्या विरोधी पक्ष पदावर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांची नियुक्ती करावी अशा प्रकारची शिफारस उपसभापती यांच्याकडे केली आहे.
- विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती होईल.
- महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांशी विचारविनिमय करूनच निर्णय घेत आहोत. संख्येचा विचार केला तर संख्याबळ पण आमच्याकडे आहेत आपसातील कोऑर्डिनेशन सुद्धा आहे.