मुक्तपीठ टीम
एकनाथ शिंंदेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंंडखोरीमुळे शिवसैनिकांमध्ये संतापाचा वणवा भडकू लागला आहे. संतापलेले शिवसैनिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करत आहेत. काही ठिकाणी बंडखोर आमदारांचे कार्यालय फोडण्याच्या घटना घडत आहेत. पुण्यात आमदार तानाजी सावंतांचं कार्यालय फोडल्यानंतर आता शिवसैनिकांनी थेट एकनाथ शिंदेंचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंच्या कार्यालयावरच हल्ला केला आहे. सुरू केले आहे.
शिवसैनिकांचा संतापाचा भडका, शिंदेंची संरक्षण हटवल्याची तक्रार
शिवसैनिकांचा वाढता संताप पाहून पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई आणि ठाण्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांचे संरक्षण काढण्यात आल्याची तक्रार केली आहे. पण मुळात आमदारांना संरक्षण असते, कुटुंबाला नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आमदारांच्या कुटुंबियांनाही संरक्षणाची घोषणा केली.
मुंबईत रस्त्यावर संताप, तोडफोड
शिंदेंच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये शिवसैनिकांनी वेगवेगळ्या ठिकाणी संताप व्यक्त केला. आमदार सदा सरवणकर यांच्या पोस्टरला काळे फासले, तर मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाच्या फलकाची तोडफोड करण्यात आली. दिलीप लांडेंच्या विरोधातही शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली.
पुण्यात तानाजी सावंतांचे कार्यालय तोडले
पुण्यातील आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयात शनिवारी शिवसैनिकांनी घुसून तोडफोड केली. तानाजी हे बंडखोर आमदारांपैकी एक आहेत. शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, “आमच्या कार्यकर्त्यांनी तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्रास देणाऱ्या सर्व बंडखोर आमदारांना या प्रकाराला सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्या कार्यालयावरही हल्ला करण्यात येणार आहे.
कोल्हापुरात निषेध मोर्चा, बंडखोरांटे फलक फाडले
‘शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है’ च्या घोषणा देत शिवसैनिकांनी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे शहरातील विविध ठिकाणचे पोस्टर्स फाडले. तर, अनेक ठिकाणी शिवसेनेच्या पोस्टर्सवरील केवळ क्षीरसागर यांचे फोटो फाडण्यात आले आहे.
नाशिकमध्ये शिंदेंच्या फलकावर शाईफेक
नाशिकमधील शिवसेनेच्या समर्थकांनी ‘एकनाथ शिंदे हाय हाय’च्या घोषणाबाजीमध्ये शहरामधील चौकात लावलेल्या एकनाथ शिंदेंच्या बॅनरवर शाईफेक केलीय. तसेच यावेळेस कार्यकर्त्यांनी या बॅनरवर अंडीही फेकली आहेत. विशेष म्हणजे शाईफेक आणि अंडीफेक करण्यामध्ये शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांचाही मोठ्या संख्येने समावेश होता.
खासदार श्रीकांत शिंदेंच्या कार्यालयावर हल्ला
पुण्यात आमदार तानाजी सावंत यांचे कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्यानंतर, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे जे आता एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत, त्यांचे उल्हासनगर येथील कार्यालय फोडण्यात आले आहे.
ठाण्यात शिंदेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली, समर्थकांची गर्दी
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तेथे त्यांच्या समर्थकांची गर्दी जमली आहे. शिंदे सध्या राज्यातील इतर बंडखोर
आमदारांसह आसाममधील गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत.