मुक्तपीठ टीम
मुंबई शहराला नवी मुंबई शहर आणि रायगड जिल्ह्याशी जोडणाऱ्या शिवडी- न्हावा शेवा पारबंदर प्रकल्पातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. या प्रकल्पात ऑर्थोट्रोपिक स्टील डेक सुपरस्ट्रक्चरच्या पहिल्या गाळ्याची यशस्वीरीत्या उभारणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे सध्या उपलब्ध नेहमीच्या मार्गाने दक्षिण मुंबईतून अंधेरीला पोहचण्यापेक्षा कमी वेळात रायगड जिल्ह्यात पोहचणे शक्य होणार आहे.
कसा आकाराला येतोय शिवडी-न्हावा शेवा सी लिंक महाप्रकल्प?
- शिवडी आणि न्हावा शेवा या दरम्यान उभारण्यात येत असलेला पारबंदर मार्ग हा भारतातील सगळ्यात मोठा पारबंदर मार्ग आहे.
- तब्बल २२ किलोमीटर लांबीचा असा हा पारबंदर (सी लिंक) प्रकल्प असून १८ हजार कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे.
- आज या प्रकल्पात ऑर्थोट्रोपिक स्टील डेक सुपरस्ट्रक्चरच्या पहिल्या गाळ्याची उभारणी करण्यात आली.
- टाटा प्रोजेक्ट्स- देवू जेव्ही यांच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात येत असून असे ३२ गाळे बसवून हा ७.८१ किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम पूर्ण केले जाणार आहे.
- या गाळ्याच्या फॅब्रिकेशनचे काम जपान, दक्षिण कोरिया, तैवान, व्हिएतनाम, म्यानमार या देशात करण्यात आले असून १८० मीटर एवढ्या लांबीच्या अजस्त्र गर्डर तयार करण्यात आले आहे.
- या संपूर्ण स्ट्रक्चरचे लाँचिंग करण्यासाठी एका खास बार्जची निर्मिती करण्यात आली आहे.
- याशिवाय प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात शिवाजी नगर येथील इंटरचेंजचे काम देखील करण्यात येणार आहे.
- या प्रकल्पाचे काम जवळपास ६५ टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
मुंबई – नवी मुंबई दरम्यानचे अंतर कमी होणार; ठाणे-रायगड जिल्हे एकमेकांना जोडले जाणार- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
शिवडी- न्हावा शेवा पारबंदर प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई आणि नवी मुंबई या शहरातील अंतर कमी होणार असून ते २० मिनिटात कापता येणे शक्य होणार आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील चिरले पर्यंत हा पारबंदर प्रकल्प जाणार असल्याने ठाणे आणि रायगड हे जिल्हे देखील एकमेकांना जोडले जाणार आहेत. या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मोठी मदत होणार असून त्याद्वारे जेएनपीटी बंदरातून होणारी वाहतूक अधिक वेगवान होणार असल्याचे मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
या गाळ्यांच्या लाँचिंगसाठी कारंजा येथे विशेष जोडणी यार्ड तयार करण्यात आले असून तिथे जोडणी करून ते समुद्रात नेण्यात येतात. त्यासाठी खास बार्ज तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे अतिशय नियोजनबद्धरित्या हे महाकाय गाळे लाँच करण्याचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी स्पष्ट केले. आज करण्यात आलेल्या या कामामुळे हा पारबंदर प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.