मुक्तपीठ टीम
कोरोना महामारीच्या काळात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवड्यासाठी जबाबदार ठरवत अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची बदली करण्यात आली आहे. ही बदली भाजपा नेत्यांना रेमडेसिविरची परवानगी देण्यावरून झाल्याचे बोलले जाते. राज्य सरकारने केलेल्या या बदलीला शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विरोध केला आहे. अभिमन्यू काळे यांच्या कामाची प्रशंसा करत त्यांची बदली अतिशय चुकीची आणि निषेधार्ह आहे, असं आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचेच असताना शिवसेनेच्याच माजी खासदाराने केलेल्या या विरोधामुळे वेगळी चर्चा रंगली आहे.
शिवाजीराव आढळराव काय बोललेत?
- अभिमन्यू काळे यांना मी जवळून ओळखतो. राजकीय हितापेक्षा लोकहित नजरेसमोर ठेवून, त्यांनी आपल्या पदाला योग्य न्याय दिला आहे.
- त्यामुळेच त्यांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून बदलीला सामोरं जावं लागलं आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.
- मराठमोळ्या शेतकरी कुटुंबातील एका प्रामाणिक आणि कष्टाळू अधिकाऱ्याच्या तडकाफडकी बदलीला माझा ठाम विरोध आहे.
जनसेवेसाठी अखंड काम करणाऱ्या या कार्यकुशल अधिकाऱ्याला माझा जाहीर पाठिंबा आहे.
अभिमन्यू काळे यांची बदली का झाली?
- रेमडेसिविरच्या पुरवठ्यावरुन राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार राजकारण रंगलं आहे.
- रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध करून घेण्यात अपयश आल्याच्या कारणावरून अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
- त्यांच्या जागी परिमल सिंग यांच्याकडे एफडीए आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
- एफडीए आयु्क्त काळे यांनी रेमडेसिविरसाठी भाजपाला दिलेल्या पत्रामुळे देखील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नाराज होते.
- काळे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीच मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. त्यानंतर काळे यांची बदली करण्यात आली.
- मुळात त्यांच्या नियुक्तीला राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक मंत्र्यांचा विरोध होता.
- त्यांच्याजागी हरिष बैंजल या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला नेमण्याचा आग्रह धरण्यात आला होता. मात्र, राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या लॉबीने विरोध करत तसे होऊ दिले नव्हते.