योगेश केदार
आपल्याला माहितीय का? दिल्ली, साऊथ ब्लॉक येथील, आजच्या नौदल प्रमुखांच्या कार्यालयात प्रवेश करत असताना उजव्या बाजूला एक खूप सुंदर पुतळा आहे. उजव्या हातात म्यानातून बाहेर काढलेली तलवार, मिश्या भरदार, मर्दानी हावभाव, नजरेत जरब, छाती भरदार, अंगात वस्त्र चुडीदार, मराठमोळी टोप मस्तकावर, भाळी गंधाची चंद्रकोर, गळ्यात सोन्या- मोत्यांची माळ जणू दुश्मनाचा काळ. शिवरायांचा मावळा, स्वराज्याचे पहिले नौदल प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे….. यांची ही मूर्ती जणू सर्वात मोठा पुरावा आहे की मराठेच भारतीय नौदलाचे प्रेरणास्थान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याचा एवढा रुबाब! तर मग विचार करा महाराजांचा केवढा मोठा दरारा असेल तेंव्हा.)!
शिवाजी महाराज हे मध्ययुगीन भारतात नौदलाचे महत्व ओळखणारे एकमेव राज्यकर्ते होते. डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, हबशांवर जर नियंत्रण ठेवायचं असेल तर नौदलाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी मनोमन ताडलं होतं. त्याच बरोबर जगाशी व्यापार उदीम करण्याकरता सागरावर आपलं नियंत्रण असलं पाहजे असा त्यांचा ठाम विश्वास होता. शिवाजी पुत्र संभाजी महाराजांनी सुद्धा ते धोरण पुढे नेलं. कोल्हापूर राजघराण्याने तर ब्रिटिशांनी पूर्ण भारत कब्जा करे पर्यंत समुद्रावर आपलं वर्चस्व ठेवलं होतं. ब्रिटिशांनी बाकी समकालीन सत्तांवर वर्चस्व राखलं यामागेही त्यांचं नौदल सामर्थ्यच होतं. पहिल्या महायुद्धात नौदलांमध्ये झालेल्या लढाया फार महत्वपूर्ण आहेत. दुसऱ्या महायुद्धामध्ये तर सुरुवातीला जर्मनीचं वर्चस्व वाढत होतं. त्यामागे त्यांनी केलेला नौदल शक्तीचा वापर. नवनवीन गोष्टींचा शोध आणि नाविन्यपूर्ण संदेश यंत्रणांचा सुयोग्य वापर यामुळे एक वेळेपर्यंत ब्रिटिश पूर्ण हात वर करण्याच्या स्थितीत आले होते परंतु वेळेत अमेरिकेकडून मदत झाली म्हणून ते वाचले. आजही ते तितकंच खरं आहे. अमेरिकेचं जगात आज जे वर्चस्व आहे त्यामध्ये त्यांच्या नौदलाचा फार मोठा वाटा आहे. आजघडीला चीन सुद्धा त्यांचं नौदल फार वेगाने मजबूत करून घेत आहे.
आधुनिक भारतीय नौदलाची स्थापना ही १९३४ मध्ये झाली. ‘रॉयल इंडियन नेव्ही’ चा इतिहास देखील फार रंजक आहे. याच नौदलामध्ये असलेल्या भारतीय नाविकांनी १९४६ मध्ये ब्रिटिशांविरोधात उठाव केला होता. ब्रिटिशांना यामुळे फार मोठा धक्का बसला होता. भारताला आता यापुढे आपण जास्त काळ पारतंत्र्यात ठेऊ शकणार नाही याची त्यांना जाणीव झाली होती. असं म्हणतात की यातूनच पुढे भारतीय स्वातंत्र्याची पहाट जवळ आली. आणि अखेर १९४७ ला आपण स्वतंत्र झालो. त्यामध्ये नाविकांच्या क्रांतीने फार मोठी भूमिका निभावली होती. असो,
आज जो आपण भारतीय नौदल दिन साजरा करतो तो भारतीय नौदलाने १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावेळी बजावलेल्या भूमिकेमुळे. आजच्याच दिवशी भारतीय नौदलाने पाकिस्तानी पाणबुडी ‘गाझी’ ला जलसमाधी दिली. आय एन एस विक्रांत या विमानवाहू नौकेने ने बंगालच्या उपसागरात दरारा निर्माण केला होता. तिकडे अरबी समुद्रात म्हणजे पश्चिम कमांड ने कराची बंदरावर्ती जोरदार चढाई केली. पाकिस्तानी सैन्याने अथवा नेतृत्वाने याची कल्पनाच केली नव्हती. नौदलाची हि कामगिरी एवढी जबरदस्त होती की जगात पाकिस्तानी नेतृत्वाची नाचक्की झाली. तिकडे पाकिस्तानी लष्कराने काही दिवसातच शस्त्र टाकून हात वरती केले.
अहो या युद्धाने एका देशाचे दोन देश केले.पाकिस्तान मधून बांगलादेश धडावेगळं केलं. नौदलाचे फार मोठे यश आणि योगदान भारतीय इतिहासात आहे.
शिवभक्त, राष्ट्रभक्त म्हणून मला त्याचा गर्व आहे. की या उज्ज्वल परंपरेचे अखंड प्रेरणा श्रोत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि आम्ही त्यांच्या विचारांचे पाईक आहोत.
(योगेश केदार हे मुक्त लेखक आहेत. दिल्लीत १० वर्ष वास्तव्य केल्यामुळे राजकारणाची आवड आणि त्यातून निर्माण झालेली सामाजिक समज यामुळे ते लिहिते झाले आहेत.)
संपर्क 9013181308
ट्विटर @yskedar2