शिरीष भोसले
अतीवृष्टीमुळे यंदा खरीप पिकांचे आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. हाता वरचे पोट असणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती विस्कळीत होत चालली आहे. शेतकऱ्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने नुकसानभरपाईबरोबरच पिक विमा देखील मिळणार असल्याचे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने शासनाने पिक विमा हफ्ता पिक विमा कंपनीला अदा केलेला आहे. परंतु विमा कंपनीच्या निष्क्रिय व भ्रष्ठ कारभारामुळे अद्याप शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पिक विमा मिळाला नाही. याचा विचार करता शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्यांना निर्वाणीचा इशारा द्यावा लागत आहे, लवकरात लवकर विमा वाटप सुरु केले नाही, तर पिक विमा कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्यांसह ठिय्या अंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही.
या वर्षी खरीपाबरोबरच रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे भारी नुकसान झाले आहे. खरीपातील मुग,कापुन,सोयाबीन, तुर, बाजरी ही पिकांचे नुकसान झाले असून, पंधरा दिवसापूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे ऐन काढणीला आलेला गहु, हरभरा, कांदा तसेच बाजरी व इतर फळबागांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच गारपीटीच्या पावसामुळे पूर्ण रब्बी पीके मातीमोल झालेली आहेत. या अस्मानी संकटामुळे शेतकरी राजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी सरकारने व विमा कंपनीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना विमा वाटप करुन दिलासा देणे गरजेचे आहे.
लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. अर्थव्यस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. अशावेळी लोकप्रतिनिधी झोपेचं सोंग घेणार असतील आणि पिक विमा कंपनी आपला मुजोरपणा सोडणार नसेल तर शेतकरी त्यांना चांगलाच धडा शिकवतील. त्यामुळे अशा संकटग्रस्त काळात शासनाने हस्तक्षेप करुन पिक विमा कंपनीला देण्यासाठी भाग पाडावे व शेतकऱ्यांची आर्थिक घडी सुरळीत करावी जेणेकरून पुढच्या हंगामाच्या मशागतीची तयारी करणे सोयीस्कर ठरेल.
उत्पादन खर्चाची सुद्धा पुर्तता न झाल्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे. शेतकऱ्यांचे पोट हे शेतीतल्या उत्पादनावर भरत असल्यामुळे आता दैनंदिन खर्चाची सुद्धा घडी विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही,अशा परिस्थितीत सरकारने जर हस्तक्षेप केला नाही तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील. त्यामुळे सरकारने या घटनेकडे गांभीर्याने पाहावे व वेळीच हस्तक्षेप करुन या घडीला विमा कंपनीला विमा देण्यासाठी भाग पाडावे अन्यथा शेतकरी विमा कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन करून दणका देतील!
(शिरीष भोसले हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत)