मुक्तपीठ टीम
दसरा मेळावा अवघा तीन दिवसांवर ठेपलेला असताना शिंदे गटानं शिवसेनेला नवा धक्का दिला आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर फिरून बंडखोरांविरोधात शिवसंपर्क यात्रेच्या माध्यमातून वातावरण पेटवत आहेत. त्यामुळेच त्यांनाच त्यांच्या मतदारसंघात अडचणीत आणण्याच्या रणनीतीवर शिंदे गट काम करत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोळीबांधवांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन हा प्रवेश केला आहे. हा प्रवेश रोखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. शिंदे गटानं वरळी मतदारसंघ लक्ष्य करणं हे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासाठी संकट मानलं जात आहे.
वरळीचं शिवसेनेसाठी महत्व!
- लालबाग, परळ प्रमाणेच वरळी हा सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.
- शिवसेना नेते दत्ताजी नलावडेंच्या सतत १९९०, १९९५, १९९९, २००४ चार निवडणुकीतील विजयांची परंपरा २००९मध्ये सचिन अहिरांनी खंडित केली.
- २०१४मध्ये सुनिल शिंदेंनी ती परंपरा पुन्हा सुरु झाली आणि आता आदित्य ठाकरेंपर्यंत ती परंपरा कायम आहे.
- २०१९च्या निवडणुकीत सचिन अहिरांनाच शिवसेनेत आणून होतं तेही आव्हान संपवण्यात आलं.
- मात्र, तिथून शिवसेना नेते आदित्य ठाकरे निवडून येत असल्याने तिथंच शिवसेनेला कमजोर करण्याची शिंदे गटाची रणनीती दिसत आहे.
- त्यासाठी आधी गणेशोत्सवात आणि आता नवरात्रोत्सवातही वरळीतील मंडळांना मोठ्या प्रमाणावर महत्व देण्यात आलं.
- विरोधात असणारं कुणीही असलं तरी त्यांना गळास लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
शिंदे गटात जाहीर प्रवेश…
- आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून विजयी झाले होते.
- वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे.
- आज वरळीतील कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
- त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले.
शिंदे गटाचे पावसकर म्हणतात, धक्का आणखी बाकीच!
- वरळीतील शिवसैनिकांच्या शिंदे गटातील प्रवेशावर शिंदे गटाचे नेते किरण पावसकरांची प्रतिक्रिया शिवसेनेला धोक्याचे संकेत देणारी आहे.
- हा धक्का नाहीये, धक्का तर आणखी बाकी आहे.
- अजून अनेकांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे.
- हाच खरा जनतेचा मुख्यमंत्री अशी भावना नागरिकांची आहे.