मुक्तपीठ टीम
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येमुळे अवघ्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला होता. हळहळ व्यक्त झाली. मात्र, आजवर त्यांच्या मृत्यूचा तपास पूर्ण झालेला नाही. त्यांच्या वापरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधून ती माहिती काढणे मुंबई सायबर विभागाला जमू शकलेले नाही. त्यामुळे आता ती जबाबदारी पुण्याच्या सायबर विभागाकडे सोपवण्यात आली आहे.
३० नोव्हेंबरला डॉ. शीतल आमटे यांनी आनंदवनातील आपल्या राहत्या निवासस्थानी आत्महत्या केली. अखेरच्या काळातील त्यांचे लिखाण, व्हिडीओ, टिपण, संदेश पोलिसांच्या तपासाच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे, असे मानले जात आहे. यासंबंधित पोलीस तपास सुरू असून फॉरेन्सिक अहवालाबाबत अद्यापही काहीही स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळावरून पोलिसांनी ३ मोबाइल, एक लॅपटॉप,१ टॅबलेट हे ताब्यात घेतले आहेत. ते परीक्षणासाठी मुंबईच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले होते.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंपैकी एका ‘आयपॅड’ लाच डॉ. आमटे यांनी पासवर्ड म्हणून स्वतःचे डोळे ठेवले होते. पण उर्वरित वस्तूंना साधा पासवर्ड होता. त्यामुळे आयपॅड उघडण्यासाठी खास तज्ज्ञांचीच मदत लागेल अशी शक्यता होती. इतर वस्तू साध्या पासवर्डसह असल्याने त्यातील ‘डेटा’ घेऊन माहिती हुडकून काढणे तज्ज्ञांनाच जमू ही कठीण जाणार नाही असे मानले जात होते. पण त्यात यश न आल्याने सदर वस्तू आता पुण्याच्या सायबर विभागाकडे पाठविण्यात आल्या आहेत. त्यांना यश मिळाले तर शीतल आमटेंच्या मृत्यूचे गूढ संपेल.