मुक्तपीठ टीम
उस्मानाबाद मध्ये पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ केला जात आहे, कारण तिने आंतरजातीय प्रेम विवाह केला आहे. भावाकडून सतत छळ होत असल्यामुळे अखेर बहिणीने उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे आपली कैफियत मांडली आहे. गंभीर बाब म्हणजे बहीण सात महिन्याची गर्भवती असून, सततची मारहाण, जीवे मारण्याची धमकी यामुळे आपण जगावे की मरावे, असा प्रश्न तिला पडला आहे.
विजयश्री सुधाकर मुंबरे (वय २८) असे या महिला पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. सध्या त्या तुळजापूर पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत. विजयश्रीने २०१९ मध्ये एका तरुणासोबत आंतरजातीय प्रेम विवाह केला आहे. तसेच २०१८ मध्ये साखरपुडा झाल्यापासून त्यांचा मोठा भाऊ श्रीराम मुंबरे यांच्या मनात राग सतत सलत होता. सध्या त्या सात महिन्याची गर्भवती असून मेडिकल रजेवर आहेत.
वडील शिक्षक असतानाही पोलीस बॉय म्हणून मिरवणारा भाऊ श्रीराम मुंबरे हा पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा सतत छळ करीत असून, आंतरजातीय प्रेम विवाह करण्यास मदत केल्याबद्दल दुसरी बहीण भाग्यश्री हिलाही त्रास देत आहेत. सतत जीवे मारण्याची धमकी देणे, शिवीगाळ करणे, अधून-मधून मारहाण करणे, खोटी बदनामी करणे असा उद्योग करीत आहे तसेच सतत पैश्याची मागणी करीत आहे. तुझ्यामुळे आमच्या समाजात बदनामी झाली, तुला सोडणार नाही, अशी सतत धमकी देऊन नाकीनऊ आणले आहे.
श्रीराम मुंबरे याच्याविरुद्ध उस्मानाबादच्या आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये विजयश्री यांची मोठी बहीण भाग्यश्री हिने तक्रार अर्ज दिला असता, पोलिसांनी नोटीस देवून त्याला सोडून दिले, त्यामुळे त्याचे धारिष्ट वाढले असून, तू पोलीस दलात असून, माझे काही करू शकत नाही, मी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असून, माझ्या असंख्य ओळखी आहेत. तुझा आता तर खूण करतो, अशी धमकी देत आहे. मुलाच्या या वाईट कृत्याला आई देखील पाठीशी घालत आहे. माझ्या वंशाचा हा दिवा आहे, तू आमच्या समाजात तोंड दाखवण्यास जागा ठेवली नाही, असे टोमणे मारत आहे.
सात महिन्याची गर्भवती असतानाही त्याने आपणास वायरने मारहाण केली असून, माझ्यासह माझ्या पतीस आणि सासरच्या लोकांना भाऊ श्रीराम मुंबरे यांच्यापासून जीवास धोका असल्याचे विजयश्री मुंबरे यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.