मुक्तपीठ टीम
आगामी गुजरात विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. खरं तर, पंतप्रधान मोदींच्या गृहराज्य गुजरातमध्ये, राष्ट्रवादीचा एकमेव आमदार कंधाल जडेजा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसशी आघाडी करताच राष्ट्रवादीने आपला एकुलता आमदार गमावला आहे. विधानसभा निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने कंधाल जडेजा नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
कंधाल यांनी दिला राजीनामा-
- कंधाल जडेजा यांनी सोमवारी गुजरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल उर्फ जयंत बोस्के यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, यावेळी त्यांना तिकीट न मिळाल्याने मी पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.
- पक्षाकडून तिकीट न मिळाल्यानंतरही कंधाल जडेजा यांनी ११ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला.
- २०१२ आणि २०१७ मध्ये त्यांनी पोरबंदरच्या कुतियाना मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती, परंतु यावेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उमेदवारी ही कॉंग्रेसला देण्यात आली आहे.
२०१७ मध्ये कंधाल जडेजांचा कुतियाना जागेवर विजय-
- २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत, कंधाल जडेजा यांनी कुतियाना जागेवर भाजपा आणि कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव केला, कारण तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस गुजरातमध्ये एकटी लढत देत होती.
- ११ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातमध्ये काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडीची घोषणा केली आहे, ज्याअंतर्गत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आनंद जिल्ह्यातील उमरेठ, अहमदाबादमधील नरोडा आणि दाहोद जिल्ह्यातील देवगड बारिया येथे निवडणूक लढवणार आहे. सध्या या तीन जागा भाजपाच्या ताब्यात आहेत.
कंधाल जडेजा अपक्ष म्हणून लढणार!
- राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात युती झाल्याची घोषणा झाल्यानंतर कंधाल जडेजाने कुतियाना मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि दावा केला की त्यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची परवानगी मिळाली आहे.
- त्यासाठी नंतर पक्षाकडून आपल्याला अधिकृत केले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
- कंधाल जडेजा आता अपक्ष उमेदवार म्हणून किंवा अन्य कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवू शकतात, अशी शक्यता आहे.
- गुजरातमध्ये १८२ सदस्यीय विधानसभेसाठी १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत.