मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर गरुवारी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाची आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागली. राज्यात ठाकरे सरकार जाताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आहेत. शरद पवार यांना जुन्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांबाबत आयकर खात्याने नोटीस पाठवली आहे. तर संजय राऊत आज ईडी चौकशीला सामोरे जाणार आहेत, त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
शरद पवार यांनाही आयकर खात्याने नोटीस पाठवली आहे. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश भरत तपासे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये बदल झाल्यानंतर लगेचच आयकर विभाग शरद पवार यांना २००४, २००९, २०१४ आणि २०२० च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांसाठी नोटीस देतो. हा निव्वळ योगायोग आहे की आणखी काही?, असे ते म्हणाले.
शरद पवारांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक!
- एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.
- त्यात ते म्हणाले होते की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले जाईल, अशी अपेक्षा नव्हती.
- पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले
- एकनाथ शिंदे यांच्या नवीन जबाबदारीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
- एवढ्या मोठ्या संख्येने आमदारांना गुवाहाटीत नेण्याची ताकद त्यांनी दाखवली.
- त्यांनी लोकांना शिवसेना सोडण्याची प्रेरणा दिली.
- मला माहित नाही की हे आधी घडले की नाही, परंतु तयारीशिवाय हे होऊ शकत नाही.
संजय राऊत ईडी चौकशीला हजर!
- ईडीने संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात चौकशी करण्यासाठी समन्स पाठवले आहे.
- यापूर्वी एप्रिल महिन्यात ईडीने पत्राचाळ प्रकरणातच संजय राऊत यांच्या मुंबई आणि अलिबाग येथील मालमत्ता जप्त केल्या होत्या.
- यामध्ये संजय राऊत यांच्या मुंबईतील राहत्या घराचाही समावेश होता.
- गोरेगावमधील पत्राचाळ जमीन प्रकरणात १०३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
- ईडीने दुसऱ्यांदा नोटीस दिल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत आज दुपारी ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत.
- त्यांनी ही माहिती ट्विट करून दिली आहे.
- मी आज दुपारी १२ वाजता ईडीसमोर हजर होणार आहे. मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो. तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. मी शिवसेना कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयात जमू नये असे आवाहन करतो, असे ते म्हणाले.