मुक्तपीठ टीम
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजप, त्यातही नारायण राणेंच्या समर्थकांमध्ये टिका टिप्पणी सुरुच आहेत. राणे समर्थकांनी एक व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल करत शिवसेनेला डिवचलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत शिरणाऱ्या वाघाची शेपटी धरून त्याला नारायण राणे फरपटत नेत असल्याचं यात दिसत आहे. हा वाघ मांजरीसारखा दाखवण्यात आला आहे. त्याला गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी गावाकडचा दाखला देत टोला हाणला आहे.
काय म्हणाले शंभुराज देसाई?
- पूर्वी गावच्या जत्रेत नारळावरच्या आणि बत्ताशावरच्या कुस्त्या व्हायच्या. ती कुस्ती जिंकायची आणि हिंद केसरीला लढत दिली असं सांगायचं हा केविलवाणा प्रयत्न आहे.
- राणेंसारख्या केंद्रीय मंत्र्याला हे शोभत नाही.
- ही मध्यवर्ती बँकेची निवडणूक होती.
- नारळावरची कुस्ती जिंकून हिंद केसरीची बरोबरी नारायण राणे करु शकत नाहीत.
- खूप मर्यादित मतदारांची निवडणूक होती.
- सार्वत्रिक निवडणुकीत पुढं या, लोकमताचा कौल घ्यायला पुढं या, मग कोकणातली आणि सिंधुदुर्गमधली शिवसेना काय आहे हे नारायण राणे यांना कळेल.
राणेंचा मुख्यमंत्री, शरद पवार, अजित पवारांवरही निशाणा
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतल्या विजयानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारचा समाचार घेतला. आता टार्गेट महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आहे, असंही ते म्हणाले. येत्या विधानसभेत महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता येईल, आम्हाला भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे, लगानची टीम नकोय आम्हाला, असं सूचक विधान त्यांनी केलं. तसंच काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी संस्था वाढवायला अक्कल लागते, डोकं लागतं, बंद पाडायला अक्कल लागत नाही, अशी कोपरखळी नारायण राणेंना लगावली होती. मात्र जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारल्यानंतर नारायण राणेंनी अर्थ खात्याचे मंत्री येतात, तिन्ही पक्षाचा पराभव करून जातात त्याला अक्कल म्हणतात, असा टोला अजित पवारांना लगावला.