मुक्तपीठ टीम
राधेचं निस्सीम प्रेम आणि मीरेची उत्कट भक्ती यांच्या अदभूत मिश्रणाच्या गायकीची उत्कृष्ट पेशकश ज्येष्ठ गायिका संध्या घाडगे यांनी केली. पनवेलचा महागणपती समोर भजनी सेवा अदा करताना घाडगे यांनी त्यांच्या मधुर आवाजाचा झुला आभाळाला टांगला होता. त्या झुल्यावर श्रीकृष्ण आणि राधा झोके घेत होते, तर मीरा विणेच्या झंकरातून श्रीकृष्णाला आळवित होती, इतके मनोहरी दृश्य त्यांनी आवाजाच्या ताकदीने एक राधा एक मीरातून उभे केले होते.
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आयोजित पनवेलचा महागणपती तथा श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज जन्मोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल आणि लाभत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पावित्र्याचे जतन करणारे ठरत आहे.
मराठी, हिंदी गीते आणि सर्वोत्तम बंदिश सादर करताना गायकाचा कस लागतो. परंतु, संध्या घाडगे यांनी अतिशय हळुवारपणे सगळ्या जागा उत्तमरित्या सांभाळत गायकी सिद्ध करताना भजनाची उंची वाढवली.
संत वाणी, अभंग रचना, गवळण त्याशिवाय मराठी लोकप्रिय गीते, हिंदी गीते असे गायनातील सर्व प्रकार त्यांनी उत्तमरित्या हाताळले. भक्तीची दिक्षा देणारी ज्ञानेश्वर माऊली, वैकुंठाचा राणा साक्षात विठ्ठल, संत तुकोबा, एकनाथ, नामदेव, जनाई, चोखामेला, निवृत्ती, सोपान, मुक्ताई अशा महाराष्ट्रातील संतांसह शेजारच्या राज्यातील संतांनाही त्यांनी गायकीतून प्रकटण्यास प्रवृत्त केल्याने संध्या घाडगे यांच्या जादुई आवाजाची सावली सांज रंगात, श्याम रंगात न्हावून निघाली होती.
सांज ये गोकुळी म्हणत त्यांनी धुळ उडवत निघालेल्या गाई आणि गोकुळ अक्षरशः इथे उभे केले होते. एक तारी संगे एकरूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हाहलो, अशी एक तार छेडत जीवनाच्या इतर व्यर्थ तारा काही कामाच्या नसल्याचाही त्यांनी संदेश देत भगवंताशी एकरूप होण्याचा कानमंत्र सहजपणे दिला.
जुन्या, नव्या भजनातून त्यांनी पंढरी, आळंदी, देहू, पैठण अशी सारी तीर्थक्षेत्र महागणपती चरणी आपल्या माधुर्यपूर्ण आवाजाने निर्माण केल्याने पनवेलची कीर्ती आभाळभर पसरत चालली आहे. त्यांना तबला वादक, धनंजय खुटले, पखवाज वादक मंगेश साळुंखे, टाळ वादक प्रतिक जेऊर्गी, कोरस गीता जेऊर्गी आणि स्वप्ना ठाकूर यांनी साथ दिली