मुक्तपीठ टीम
पर्यावरणाला मदत व्हावी आणि पावसाळ्यात जमिनीत फळ झाडाची लागवड व्हावी म्हणून मुंबईतील मालडमधील राष्ट्र सेवा दलाने सीड बॉल तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. अशीच कार्यशाळा मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही आयोजित केली. मुंबई परिसरात सध्या पर्यावरणस्नेही सीड बॉल कार्यशाळांचं आयोजन वाढत आहे. त्यामुळे हे सीड बॉल नेमके कसे त्याबद्दल अनेकांना कुतुहल आहे.
मुंबईच्या मालाड या पश्चिम उपनगरातील मालवणीमधील राष्ट्र सेवा दलाचे निसार अली सय्यद,मनोज परमार,नमिता मिश्रा,मेरी चेट्टी,वैशाली महाडिक,आदीच्या पुढाकाराने सीड बॉल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. आंबा, सीताफळ, जांभूळ आदी फळबिया जमा करून मातीच्या साह्याने हजार एक सीड बॉल तयार करण्यात आलेले आहे.पहिल्या पावसात आरे कॉलनी,संजय गांधी उद्यान येथे हे सीड बॉल चे रोपण केले जाईल.
आजच्या या कार्यशाळेत राष्ट्र सेवा दल आणि सफल विकास वेल्फेअर सोसायटीचे अशोक शिंदे,मनोज खराडे,कृष्णा वाघमारे, सुजल मिश्रा,वसीम मुजावर,हयात मुजावर,शुभम मिश्रा,विक्रम घोरपडे, उत्कर्ष बोरले,ईश्वर,ज्योती बामगुडे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मुंबई विद्यापीठातही सीडबॉल कार्यशाळा
विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय, शिक्षण आणि विकास संस्थेमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि एनव्हायरमेंट विभागातर्फे सीडबॉल मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी पत्रकारितेचे आणि एमएससी पेंटचे विद्यार्थीसुद्धा सहभागी झाले होते.
या कार्यशाळेत संस्थेचे सहायक संचालक शिल्पा बोरकर, मराठी पत्रकारिता वर्गाच्या समन्वयक नम्रता कडू, इंग्रजी पत्रकारिता समन्वयक जैमिनदेखील आवर्जून उपस्थित होते. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी हर्ष वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली, सीडबॉल्स कसे तयार करावे याचे प्रशिक्षण घेतले.
सर्वांनी स्वतःच्या हाताने सीडबॉल्स तयार केले. पर्यावरणाची जपणूक करून शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल असल्याचे या वेळी सांगण्यात आले .
सीड बॉल म्हणजे काय?
- एखादे बी रुजण्यासाठी योग्य प्रमाणात माती आणि खत प्रामुख्याने शेणखत एकत्र करून त्याची गोळी किंवा छोटा बॉल तयार केला जातो त्यालाच सीड बॉल म्हणतात.
- सीड बॉलचा उपयोग माळरानावर झाडे लावण्यासाठी केला जातो. हल्ली तुळशी आणि इतर रोपांचेही सीड बॉल मिळतात जे घरातील कुंडीत ठेवून पाणी घातल्यास रोपे येतात.
- सीड बॉलच्या माध्यमातून योग्य पोषण मिळल्यामुळे त्यातील बिया रुजतात. रोपही चांगले येते.
- पण हे सिडबॉल बनवल्यापासून ठराविक कालावधीपर्यंतच लावले तरच उगवतात.
- जास्त जून झाले तर आतील बिया अंकुरत नाहीत, असाही इशारा दिला जातो.
राष्ट्र सेवा दलाच्या आणखी एका पर्यावरणस्नेही उपक्रमाची बातमीही वाचा:
पर्यावरणस्नेही बीजमोदक, डोंगर-दऱ्यांमध्ये बहरू दे निसर्ग कृपा!