मुक्तपीठ टीम
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या जन्मदाखल्यानंतर आता शाळा सोडल्याचा दाखले पुढे आले आहेत. शाळा सोडल्याच्या या दाखल्यावर समीर वानखेडे यांचं समीर दाऊद वानखेडे असं नाव, त्यांचा धर्म मुस्लिम असल्याचं नोंदवलं आहे. एक दाखला मुंबईतील वडाळ्याच्या सेंट जोसेफ हायस्कूल तर दुसरा दादरच्या सेंट पॉल हायस्कूल या शाळांचा आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत हे दाखले दाखवत समीर वानखेडेंवर फसवणुकीच्या आरोपांचा नवा हल्लाबोल केला आहे. त्याचवेळी सेंट पॉल हायस्कूलचे दोन दाखले समोर आले असून एकात समीर वानखेडे हिंदू तर दुसऱ्यात मुसलमान दाखवले आहेत. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत संभ्रम कायम राहणार आहे.
नेमकं काय आहे या दाखल्यात?
- सेंट पॉल आणि सेंट जोसेफ शाळेचे दोन दाखले समोर आले आहेत.
- या दाखल्यात समीर वानखेडे यांचा धर्म मुसलमान असल्याचं लिहिलं आहे.
- सेंट जोसेफ हायस्कूलचा हा दाखला १९८९चा आहे.
- त्यात समीर वानखेडे यांचा जन्म मुंबईतील दाखवण्यात आला आहे.
- तर सेंट पॉल हायस्कूलचा शाळा सोडल्याचा दाखला २७ जून १९८६चा आहे.
- त्यातही वानखेडे यांचा धर्म मुसलमान आणि जन्म ठिकाण मुंबई दाखवण्यात आलं आहे.
- त्यामुळे वानखेडे हे मुसलमान असल्याचा दावा केला जात आहे.
- मुंबई मनपानेही समीर वानखेडेंबद्दलची सर्व कागदपत्र न्यायालयात सादर केली आहेत.
समीर वानखेडेंचा खरा दाखला कोणता?
- अर्थात तरीही समीर वानखेडेंबद्दलचा संभ्रम संपलेला नाही.
- सेंट जोसेफ हायस्कूलच्या नावाने दोन दाखले व्हायरल होत आहेत.
- एका दाखल्यात समीर दाऊद वानखेडे आणि दुसऱ्या दाखल्यात समीर ज्ञानदेव वानखेडे असा उल्लेख आहे.
- पहिल्या दाखल्यात धर्म मुस्लिम दाखवण्यात आला आहे.
- तर दुसऱ्या दाखल्यात जात महार दाखवण्यात आली आहे.
- ज्या दाखल्यावर जात महार आणि वानखेडे समीर ज्ञानदेव लिहिलं आहे त्याची कॉपी अटेस्टेड करण्यात आलेली आहे.
- त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय देते, तेथेच लक्ष लागले आहे.