मुक्तपीठ टीम
कोरोना महामारीनंतर आता शाळा – कॉलेज सुरु होऊ लागली आहेत. मुंबईत अद्याप तसा निर्णय झालेला नसला तरी उर्वरित महाराष्ट्रात विद्यार्थ्यांची किलबिल वर्गात सुरु झाली आहे.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेऊनच शाळा सुरू करण्याबाबतच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मुंबईसारख्या शहरांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढलेले दिसत आहे. तीन, चार दिवसांत रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आढळले म्हणून, १५ फेब्रुवारी रोजी सुरू होणारी महाविद्यालये अजून तरी सुरू झालेली नाहीत.
महाराष्ट्रात काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली. अशीच एक शाळा कर्जत येथील कर्जत एज्युकेशन सोसायटीचे इंग्लिश मिडियम स्कूल आहे. अत्यंत उत्साह आणि आनंदात विद्यार्थ्यांचे स्वागत करून शाळा सुरू झाली. शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांप्रमाणेच आनंद झाला. त्यांनी स्वागतासाठी जो उत्साह दाखवला त्यातून तो दिसत होता. राज्य व केंद्र शासनाने दिलेल्या आरोग्य विषयक सुचनांचे पालन करून शाळा सुरु झाली आहे. लवकरच आपण कोरोनाच्या संकटावर मात करू असा आत्मविश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.
पुण्यातील महाविद्यालये देखील सुरू करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन वर्गाऐवजी थेट शिकता येईल. ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पर्याय असल्याने आजही काहीजण ऑनलाइन वर्गातच सहभागी होत आहेत. महाविद्यालयात येण्यापेक्षा तो पर्याय निवडला जात आहे.
शाळा, महाविद्यालये जरी सुरू करण्यात येत असली तरीही, विद्यार्थ्यांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. सर्व सूचनांचे पालन करून त्यांनी महाविद्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
पाहा व्हिडीओ: