मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मे २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत लाभ जारी करतील. शाळेत जाणाऱ्या मुलांना पंतप्रधान शिष्यवृत्ती रक्कम हस्तांतरित करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान मुलांसाठी पीएम केअर्सचे पासबुक आणि आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य कार्ड मुलांना वितरित केले जाईल.
११ मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत कोरोना महामारीमुळे दोन्ही पालक किंवा कायदेशीर पालक/दत्तक पालक गमावलेल्या मुलांना आधार देण्यासाठी पंतप्रधानांनी २९ मे २०२१ रोजी पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना सुरू केली होती. मुलांची सर्वसमावेशक काळजी आणि संरक्षण यासाठी शाश्वत पध्दतीने त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करणे, शिक्षण आणि शिष्यवृत्तीद्वारे त्यांना सक्षम बनवणे, वयाची २३ वर्षे पूर्ण झाल्यावर १० लाख रुपये आर्थिक सहाय्य पुरवून स्वयंपूर्ण अस्तित्वासाठी सुसज्ज बनवणे आणि आरोग्य विम्याद्वारे त्यांचे निरामय आरोग्य सुनिश्चित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. मुलांची नोंदणी करण्यासाठी pmcaresforchildren.in हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. पोर्टल ही सिंगल विंडो प्रणाली आहे जी मुलांसाठी मान्यता प्रक्रिया आणि इतर सर्व सहाय्य सुलभ करते.