मुक्तपीठ टीम
शिवसेनेत उभी फूट पडल्याने आता मूळ शिवसेना कोणाची आणि शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाकडे राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात आधीचेच खटले प्रलंबित असताना राज्य निवडणूक आयोगाने ८ ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्यास दोन्ही गटाला सांगितले. निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने हा अर्ज मान्य केला असून १ ऑगस्ट रोजी सुनावणीची तयारी दर्शवली आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे.
१ ऑगस्टला होणार सुनावणी!!
- शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात एक ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
- सरन्यायाधीश रमण्णा यांच्या खंडपीठासमोर या याचिकांची सुनावणी होणार आहे.
- केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी आज शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
- निवडणूक आयोगाच्या नोटिशीवर स्थगिती देण्याच्या शिवसेनेच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालय सुनावणीला तयार झाले आहे.
- एक ऑगस्ट रोजी इतर याचिकांसोबत याही मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे.
- या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती देणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
कागदपत्रांची मागणी करणे हा न्यायालयाच्या ‘जैसे थे’ आदेशाचा भंग!!
- पक्ष संघटनेतील वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि शिवसेनेला दिले आहेत.
- मात्र, अशा पद्धतीने कागदपत्रांची मागणी करणे हा न्यायालयाच्या ‘जैसे थे’ आदेशाचा भंग होतो, असं शिवसेनेचं म्हणणे आहे.
- त्यामुळे न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कृतीची दखल घेऊन सुनावणी स्थगित करावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती.
- त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून १ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.