मुक्तपीठ टीम
भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर देशात संतापाची लाट उसळली. संपूर्ण जगभरातून निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज कठोर भूमिका घेतली. नुपूर यांच्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच नुपूर यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, असेही न्यायालयानं त्यांना खडसावलं.
नुपूर यांच्या वकिलाने याचिका मागे घेतली!
- सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्माविरोधातील देशभरातील याचिका आणि खटले दिल्लीला हस्तांतरित करण्याची मागणी केली होती.
- नुपूर यांच्या वकिलाने सांगितले की, त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे खटले इकडे वर्ग करावेत.
- सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी कठोर भाष्य करताना त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.
- यानंतर सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका लक्षात घेऊन शर्मा यांच्या वकिलाने याचिका मागे घेतली.
टीव्हीवर देशाची माफी मागावी!
या प्रकरणी नुपूर शर्माची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, नुपुर शर्मा यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. तसंच त्यांची प्रतिक्रियाही मागे घेतली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आणि त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, असे म्हटले आहे. त्यांनी टीव्हीवर जाऊन देशाची माफी मागायला हवी होती. त्यांच्या या वक्तव्याने संपूर्ण देश पेटला आहे. टीव्ही चॅनल आणि नुपूर शर्मा यांनी कोर्टात न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही अजेंडाचा प्रचार करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.