मुक्तपीठ टीम
दिवसभर चाललेल्या वकिली युक्तिवादानंतर अखेर संध्याकाळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सध्यातरी शिंदे गटाला दिलासा देणारा ठरला आहे. निवडणूक आयोगात आता शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने निवडणूक आयोगासमोरील सुनावणीला स्थगिती दिलेली नाही. आता निवडणूक आयोग त्यावर सुनावणी घेऊन, पुरावे तपासून निर्णय घेण्यास मोकळा आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय घडेल, अशी चर्चा सुरु झाली आहे. त्याचा वेध घेणं आवश्यक आहे.
आज दिवसभरातील सुनावणीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे वकील अॅड. अॅड. कपिल सिब्बल, अॅड. अभिषेक मनु सिंघवी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वकिल अॅड. निरज कौल, अॅड. महेश जेठमलानी यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यात निवडणूक आयोगाचे वकील अॅड. दातार यांनी आयोगाची बाजू मांडत स्थगिती रोखण्यासाठी प्रयत्न केले, जे पुढे यशस्वी ठरले. देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही यात भाग घेतला.
निवडणूक आयोगात काय घडणार?
- निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर तेच खरी शिवसेना असल्याचं सांगत दावा केलेला आहे.
- उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना पुरावे सादर करत आपलं धनुष्यबाण चिन्ह आपलंच असल्याचा दावा केला जाईल.
- जर आयोगाला एकाची बाजू योग्य वाटली तर धनुष्यबाण एका गटाला देण्याचा निर्णय होईल.
- जर दोन्ही गटांच्या वादात द्विधा अवस्था असेल तर आयोग परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत धनुष्यबाण चिन्ह गोठवू शकतो. त्या परिस्थितीत दोन्ही गटांना स्वतंत्र वेगळी चिन्ह घ्यावी लागतील.
सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?
- सर्वोच्च न्यायालयात बंडखोरी केलेल्या शिंदे गटाविरोधातील अपात्रतेवरील सुनावणी सुरु राहणार आहे.
- त्यात सर्वोच्च न्यायालयाच्याच आदेशाने स्थगित झालेली उपाध्यक्षांसमोरील अपात्रततेची कारवाई पुन्हा त्यांच्यासमोरच सुरुवाच करायची का?
- राज्यपालांनी आपात्रतेची कारवाई सुरु असलेल्या एकनाथ शिंदेंना सत्ता स्थापनेचे निमंत्रण देणे योग्य आहे का?
- या अशा अन्य प्रश्नांवर तेथे सुनावणी सुरुच राहणार आहे.
- सर्वोत महत्वाचं म्हणजे पक्षांतरबंदी कायदा, त्यातील तरतुदी हे सारं संविधानाच्या १०व्या परिशिष्टात आहे. त्याचाही उहापोह सुनावणीत होईल, तो दिशादिग्दर्शन करणारा, सर्वात महत्वाचा भाग असेल.