मुक्तपीठ टीम
सौदी अरेबियाने खराब, भेसळयुक्त वस्तू विकणाऱ्या आणि बनावट ऑफर देण्याच्या कारणावरून तब्बल १८४ चीनी वेबसाइट्स बंद केल्या आहेत. एका वृत्त संस्थेच्या अहवालानुसार, या वेबसाइट्स सौदी अरेबियाच्या बाजाराला लक्ष्य करीत होत्या. तसेच दुसऱ्या एका वृत्त संस्थेच्या अहवालात म्हटले आहे की, या वेबसाइट्स ग्राहकांना परतावा, एक्सचेंज आणि विक्री सेवा देण्यासही अपयशी ठरल्या आहेत. एवढेच नव्हे तर गुणवत्तेच्या बाबतीत ही खरेदीदारांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे आता सौदी अरेबियाच्या मंत्रालयाने या सर्व साइट्सना ब्लॉक केले आहे.
अहवालात असे म्हटले आहे की, या वेबसाइट्सवर ग्राहक सेवेसह स्टोअरचा पत्ता आणि संपर्क क्रमांक लिहिलेले नाहीत. सौदी अरेबिया सरकारने सोशल मीडियाद्वारे फसव्या जाहिरातींपासून सुटका मिळवण्यासाठी सामान्य जनतेला विश्वसनीय स्टोरमधूनच खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.
सुरुवातीला एक वेबसाइट ब्लॉक करण्यात आली होती. पण त्यावेळी वेगळ्या पाच बनावट वेबसाइटसमोर आल्या ज्यामाध्यमातून वस्तूंची विक्री करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या १८४ वेबसाइट्सना एकाचवेळी जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने लॉन्च करण्यात आल्या होत्या. हेच मुख्य कारण आहे की, या सर्व वेबसाइट्सना ब्लॉक करावे लागले आहे. या वेबसाइटद्वारे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, परफ्यूम, पिशव्या, शूज, कपडे आणि सौंदर्यप्रसाधने विकल्या गेल्या असल्याचे अहवालात म्हटले आहे. मंत्रालयाने चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
दरम्यान, सौदी अरेबियानेच नाही तर पाकिस्तानमध्येही चीनला जोरदार धक्का दिला आहे. पाकिस्तान सरकारने चीनी अॅप टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पेशावर उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.