-
सरळस्पष्ट/तुळशीदास भोईटे
गेले काही महिने आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचे काम सरकारमधीलच मंत्री करत आहेत. पुन्हा त्यांच्यावर झालेले आरोप त्यांच्या कार्यशैलीबद्दल झाले असते तरी समजण्यासारखे होते. परंतु ते बेबंद जीवनशैलीमुळे होत आहेत. त्यात किती खरे किती खोटे ते उघड होईलच. परंतु सत्तेचा (मग ती सत्तेत असतानाची असो किंवा विरोधात असतानाही राजकीय प्रभावाची असो) गैरफायदा घेत या मंत्र्यांनी जे गैरवर्तन केले त्यामुळेच ते अडचणीत येत आहेत.
संजय राठोडांवर आरोप
ताजे उदाहरण शिवसेनेचे यवतमाळ जिल्ह्यातून निवडून आल्यानंतर ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री असलेल्या संजय राठोडांचे आहे. पुण्यात पूजा चव्हाण या टिकटॉक स्टार तरुणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर होत असलेले आरोप हे संजय राठोडांनाच नाही तर संपूर्ण आघाडी सरकारच्या प्रतिमेलाच संशयाच्या भोवऱ्यात ओढणारा ठरत आहे. आरोप करणाऱ्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आहेत म्हणून या प्रकरणाकडे केवळ राजकारण म्हणूनही पाहून चालणार नाही. भाजप विरोधात आहे. सरकारला विरोध करणारच. त्यातही हातीतोंडी आलेली सत्ता गेल्यामुळे कासाविस होऊन काही भाजप नेते जास्तच घायकुतीला येऊन आरोप करतात, तेही मान्य आहे. त्यामुळेच सुशांतसिंह राजपूतसारख्या प्रकरणांमध्ये आरोप कितीही झाले तरी सहानुभूती आघाडी सरकारलाच मिळाली. पण पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणात तसे नाही. तिच्या संशयास्पद मृत्यूमागे नेमके काय, हे पोलीस तपासात सिद्ध होईल तेव्हा होईल, परंतु, आरोप होत असून, काही पुरावे मांडले जात असूनही पुण्यातील पोलिसांनी ज्या पद्धतीने या प्रकरणात तपास केला आहे त्यामुळे तपास कुठच्यातरी दबावाखाली होत असून सत्य दबत असल्याचे चित्र मात्र तयार झाले.
चित्रा वाघ आक्रमक!
पुजा चव्हाण घटनेत समोर आलेले
सगळे updates पहाता याचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे
जातोपोलिसांनी स्यु-मोटोतंर्गत तक्रार दाखल करत मंत्री संजय राठोड वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
मुख्यमंत्री जी एव्हढे पुरावे असतांनाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय pic.twitter.com/2QA8KAZkW5
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 12, 2021
चित्रा वाघ यांनी हे प्रकरण लावून धरले. सातत्यानं त्या बोलत आहेत. “पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले
सगळे updates पहाता याचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे
जातो. पोलिसांनी स्यु-मोटोतंर्गत तक्रार दाखल करत मंत्री संजय राठोड वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. मुख्यमंत्री जी, एव्हढे पुरावे असतांनाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय”
ही त्यांनी शुक्रवारी केलेली मागणी पूर्ण नाही पण किमान काही अंशी तरी मान्य करता येण्यासारखी होती. थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा शक्य नसेल. पण जेव्हा राज्यातील एका मंत्र्यावर एका तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आरोप होत आहेत, थेट नाव घेऊन होत आहेत. तेव्हा किमान त्या प्रकरणाचा योग्य तपास होईपर्यंत तपासावर दबाव येण्याइतपत सत्ता हाती नसावी एवढी काळजी घेता येणे अशक्य नाही. आरोप होतात. मंत्री सत्तेतच असणार. तर मग तपास अगदी सुयोग्य झाला तरी त्या तपासाच्या निष्कर्षांवर कोणाचा कसा विश्वास बसणार?
धनंजय मुंडे प्रकरणातही चित्रा वाघ आक्रमक होत्या. त्यातील तक्रारदार तरुणीने तक्रार मागे घेताच खोट्या तक्रारीबद्दल तिच्यावरच कारवाईची मागणी करणाऱ्याही चित्रा वाघच होत्या. त्यामुळे त्या केवळ राजकारणापोटी आरोप करतात, असे वाटत नाही. भाजपापूर्वी राष्ट्रवादीतही त्या अशाच संवेदनशीलतेनं अत्याचारप्रकरणांमध्ये आक्रमक असत.
संशय गडद करणारे प्रश्नच प्रश्न!
त्यातही या प्रकरणात जे घडलं ते हातातील सत्तेमुळे काहीजण खूप काही बिघडतात, बिघडवतात हेही दाखवणारं आहे.
पूजा चव्हाण पुण्याला आली. का आली? खरं कारण काय होतं? तिच्या घरी आलेले ते दोन कुणाचे कार्यकर्ते होते? ते पुण्यात कसे? ते तिच्या घरी का आले होते? त्यांना नोकरी लावून कुणी उपकृत केले होते का? त्यांच्यावर नेमकी काय जबाबदारी सोपवण्यात आली होती?
एक नाही अनेक प्रश्न या निमित्ताने समोर येत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेली ऑडिओ क्लिपही संशय अधिक गडद बनवते. तिची सत्यता तपासणे आवश्यकच. संशय निर्माण करणारे कोणतेही प्रश्न अनुत्तरित राहू नयेत याची काळजी सत्ताधाऱ्यांनी घेतलीच पाहिजे.
आयुष्यातून कुणालाच उठवू नये! पण…
आज मुख्यमंत्री या प्रकरणाविषयी बोलले. “या प्रकरणी व्यवस्थित चौकशी केली जाईल आणि जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल. त्यामध्ये ज्यांच्यावर कारवाईची गरज असेल, त्यांच्यावर कारवाई होईल.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले तेही योग्यच. ते म्हणाले, “गेले काही दिवस लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे प्रकारही समोर आले आहेत. या प्रकरणात तसं काही होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणात सखोल चौकशी करुन सत्य जनतेसमोर आणले जाईल”
जीवनातून कुणालाच उठवले जाऊ नये. अगदी सत्तेतील आहे, आरोप होत आहेत, म्हणूनही तसे होऊ नये. मान्यच! पण जेव्हा सत्ता सत्य दडपू पाहत आहे, असा संशय गडद होऊ लागतो. मग भले ते राजकारणापोटी का असेना, तेव्हा सत्ताधाऱ्यांनी काळजी घेतलीच पाहिजे.
भाजपाने नाव घेणे, नाव न घेणे!
भाजपचे काही नेते संजय राठोडांचं थेट नाव घेत नाहीत. चित्रा वाघ उघडपणे घेतात. आक्रमकपणे बोलतात. तेव्हा काहींना त्यात वेगळं राजकारणही दिसतं. संजय राठोड बंजारा समाजाचे. त्या समाजाचे ते नेते. खूप मोठा वर्ग त्यांना मानतो. त्यामुळे काही नेते नाव घेण्यास कचरत असतील. उगाच अलोकप्रिय का व्हा, असे हिशेब असतील. संजय राठोडांमुळे बंजारा समाज शिवसेनेशी जोडला गेलेला आहे. थेट कारवाई झाली तर तोही दुखावला जाईल. शिवसेनेचे नुकसान. कारवाई नाही केली तर शिवसेनेचे मुख्यमंत्री असलेले आघाडी सरकार महिलांविषयक गुन्ह्यांच्याबाबतीत संवेदनशील नाही, आरोप तर होणारच. पुन्हा शिवसेनेचेच नुकसान. पुन्हा जो काही धोका असेल तो चित्रा वाघांसाठी! राजकारण असतेच असते!
राजकारण होतच राहिल…न्याय मिळावा! तसा विश्वास राहावा!
राजकारण असंच असते. माणसं मरतात. न्यायासाठी झगडा सुरु असतो. संघर्षाच्या त्या आगीवरही राजकारणाचा स्वार्थ शेकला जातो. जे असेल ते असेल. पण महत्वाचे असते ते न्याय मिळणे. तेवढेच न्याय मिळतो आहे. मिळाला आहे, असे सामान्यांना वाटणे. तसा सत्तेविषयी विश्वास निर्माण होणे. असेल तर तो कायम राहणे. त्यासाठीच मग भाजपा मागणी करते म्हणून संजय राठोडांवर सदोष मनुष्यवधाची कारवाई नको, पण किमान तपास योग्य पद्धतीने होईपर्यंत सत्तेतून दूर ठेवणे खरेच अशक्य आहे?
(तुळशीदास भोईटे ‘मुक्तपीठ’ मुक्तमाध्यम उपक्रमाचे मुख्य संपादक आहेत)