सरळ-स्पष्ट / तुळशीदास भोईटे
“मी त्या भाग्यशाली लोकांपैकी आहे जे कधीच पाकिस्तानात गेले नाहीत. मी जेव्हा पाकिस्तानातील परिस्थितीबद्दल वाचतो, तेव्हा मला भारतीय मुसलमान असण्याचा अभिमान वाटतो!” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांच्यासाठी अश्रू ढाळले त्या गुलाम नबी आझाद यांचे आजचे उद्गार खूप महत्वाचे! त्यांच्या राज्यसभेतील या टर्मच्या निरोप भाषणाला खासदारांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आझाद यांनी जीवनभर जपलेलं ‘भारतीयत्व’ विचारांना मिळालेली दादच ती!
राज्यसभेतून आज चार खासदारांना निरोप देण्यात आला. त्यापैकी काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद एक. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेनेचे संजय राऊत अशा अनेक नेत्यांनी आझाद यांना निरोप देताना त्यांच्या प्रशंसेत काही न्यून राहू दिलं नाही. कुणीच हातचं राखून बोललं नाही, ते उगाच नाही. आझादांचं आजचं भाषण त्यांनी जीवनभर जपलेलं भारतीयत्वाचं तत्वज्ञान मांडणारं ठरलं. जो भारताचा तो आपला. जो आपला तो फक्त आणि फक्त भारताचाच!
गुलाम नबी आझाद यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानला त्याची लायकी दाखवली. भारतीय मुसलमानांसाठी भारतच जगातील सर्वोत्तम देश असल्याचे ठणकावून सांगितलं.
ते म्हणाले, “मी कधीच पाकिस्तानात गेलो नाही. परंतु मला त्या देशातील समस्या आणि परिस्थितीची कल्पना आहे. मला अपेक्षा आहे, भारतीय मुसलमानांना त्या परिस्थितीचा कधीच सामना करावा लागणार नाही. अनेक देशांमधील परिस्थिती पाहिल्यानंतर मला भारतीय मुसलमान असल्याचा अभिमान वाटतो”
त्याचवेळी ते म्हणाले तेही महत्वाचं, “मुसलमानांना भारताचा अभिमान असलाच पाहिजे. पण त्याचवेळी बहुसंख्याक समाजाने अल्पसंख्याक समाजाच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलंच पाहिजे.”
गुलाम नबी आझाद यांनी जे सांगितले ते सर्वांसाठीच. जे अल्पसंख्याकांचे मग ते मुसलमान असो वा अन्य धर्मीय…त्यांचे लांगूलचालन करणे म्हणजेच धर्मनिरपेक्षता मानतात, त्या तथाकथित धर्मनिपेक्षतावाद्यांसाठीही आणि जे मुसलमान म्हणजे पाकिस्तानचेच या भ्रमात जगत भारताचेच नुकसान करतात त्या तथाकथित राष्ट्रवाद्यांसाठीही….सर्वांसाठीच आझादांचं भारतीयत्व तत्वज्ञान महत्वाचं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भावूक झाले. शरद पवारांनीही मनमोकळेपणानं आझादांचं कौतुक केलं. संजय राऊत यांनीही आझादांना निरोप देणार नाही कारण ते संसदेत पुन्हा यावेत, असे म्हणालेत. त्यांनी देशाचीच इच्छा बोलून दाखवली. आझादांच्या भारतीयत्वाचाच तो सन्मान!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसच्या गुलाम नबी आझादांवर स्तुतिसुमने उधळणे समजू शकतो. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवादी हल्ल्याच्या वेळच्या आझादांच्या आपुलकीच्या वागण्याने कितीही भावूक झाले तरी ते थोडं जास्तच होते असे अनेकांना वाटते. असेलही तसे. कारण एका खास पद्धतीने ते गाजवले गेले. त्यामुळे जम्मू आणि काश्मिरच्या नव्या केंद्रशासित प्रदेशातील आगामी निवडणुकीसाठीची पंतप्रधान नरेंद्र मोदींची ती व्यवहार लक्षात ठेवत केलेली भावनिक गुंतवणूक होती, असेही म्हटले जाते. आझादांनी गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींबद्दल नाराजीही व्यक्त केली. ते सारं मांडत वेगळी शक्यताही वर्तवली जाते. पण जर तसेही असले तरी पुन्हा प्रश्न तोच आझादांनी राज्यसभेत मांडलेलं भारतीयत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजपलाही झेपणारे आहे का?
त्यामुळेच प्रश्न एवढाच की प्रशंसा तर साऱ्यांनीच केली. पण ज्यासाठी आझादांचं वेगळंपण साऱ्यांनाच भावलं, ते आझादांचं भारतीयत्व खरंच प्रत्येकजण आचरणात आणतील? तसं त्यांच्या पक्षातही अनेकांना निखळ भारतीयत्व झेपत नाही, इतरांना कितपत झेपेल? अगदी स्वत: आझादांनाही! नाही तर फक्त बोलताना आदर्शवादी आझाद आणि वागताना मात्र…असो चालायचंच!
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्तमाध्यम उपक्रमाचे मुख्य संपादक आहेत संपर्क ९८३३७९४९६१ )
twitter – @TulsidasBhoite FB – @Muktpeeth
भोईटे जी, तुम्ही भोळेबाबडे तरी आहात किंवा छुपे ‘राष्ट्रभक्त’. अहौ, मुसलमान असूनही पाकिस्तान ला न जाण किंवा पाकिस्तानला नाव ठेवण यात कसला आलाय पराक्रम आणि कसले भारतीयत्त्व. मला तर वाटत भाजपाच्या भावी काश्मीर मुख्यमंत्री कोण याची ही नांदी होती.
पंतप्रधान मोदींची कार्यक्षमता ज्यांना पहावत नाही, झेपत नाही, समजत नाही त्या साऱ्यांनाच नेहमी पंतप्रधानांच्या प्रत्येक कृतीमध्ये आणि वाक्यामध्येही काहीतरी स्वार्थच दिसत असतो. या लेखातही तो तसाच दिसतो आहे. बाकी साऱ्यांकडे उमदेपणा आणि निखळ अभिव्यक्ती असू शकते. केवळ नरेंद्र मोदी त्याला अपवाद आहेत असं अनेकांना वाटत असतं. या लेखातही तीच धारणा दिसते.