बॉलिवूडमधील स्टारकिड्स म्हणुन सारा अली खान ही टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मात्र गेल्या काही काळात ती बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत होती. सुशांत आत्महत्या प्रकरणात एनसीबीने केलेल्या तपासात अर्जुन रामपाल, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, भारती सिंह यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांसोबतच साराचं देखील नाव आले होते. मात्र तिच्याविरोधात कुठलाही पुरावा न सापडल्यामुळे एनसीबीनं पुढील कारवाई केली नाही. परंतु या ड्रग्ज प्रकरणाचा फटका तिच्या फिल्मी करिअरला बसला आहे.
‘हिरोपंती २’ या आगामी चित्रपटातून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अभिनेता टायगर श्रॉफचा ‘हिरोपंती २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘हिरोपंती’ या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्री सारा अली खानची निवड करण्यात आली होती. परंतु ड्रग्ज प्रकरणात तिचं नाव समोर आल्यामुळे या प्रोजेक्टमधून तिला बाहेर करण्यात आलं आहे. दरम्यान या प्रकरणावर सध्या सारा अली खानने कोणतेही भाष्य केलेले नाही.