संजीव भोर पाटील / व्हाअभिव्यक्त!
आरक्षण आणि इतर अनेक समस्यांबाबत मराठा समाजावर पराकोटीचा अन्याय सुरू आहे. मराठा समाजातील छोट्यात छोटा ते मोठ्यात मोठा कार्यकर्ता, नेता (अपवाद फार थोडे) समाजाच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर देखील भूमिका घेताना आधी आपला पक्षच कसा खरा हे मांडण्याचा आटापिटा करताना रोजच दिसतो आहे. उदाहरणादाखल समाजाशी निगडीत काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्या समोर ठेवतो. आपले पक्षप्रेम बाजूला ठेवून समाज हितासाठी तटस्थ नजरेने जरा विचार करून बघा. मागे दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी एका निर्णयाद्वारे सुधारणा केल्या होत्या. मात्र न्यायालयाच्या या निर्णयास SC, ST वर्गाने विरोध केला. कॉंग्रेसवाल्यांनीही या निर्णयाचा आंदोलन करून विरोध केला. एखाद्या कायद्याच्या गैरवापराने असंख्य लोक देशोधडीला लागले तरी ते तसेच चालले पाहिजे अशी भूमिका राजकीय पक्षांकडून घेतली जावी व यास त्याच पक्षातील सर्वांचे समर्थन कसे असू शकते? या पक्षातील मराठा किंवा इतर जातींतील नेत्यांस,कार्यकर्त्यांस याचे काहीच वाटू नये? राजकारणापायी समाज किती दुय्यम ठरवला जातो पहा!
भाजप व मोदींनीही संसदेत पुन्हा आणखी कठोर कायदा करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयच रद्दबातल ठरवला.मात्र यास या पक्षातील एकाही मायच्या लालला काहीच वाटू नये? म्हणे कट्टर हिंदू!!
दुटप्पीपणा आणि लबाडीचा कळस पहा. अॅट्रॉसिटी प्रमाणेच सर्वोच्च न्यायालयाने SEBC अर्थात मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्या नंतर आता पुन्हा मराठा समाजाला आरक्षण द्यायचे झाल्यास ते संसदेत कायदा करूनच दिले जाऊ शकते.अॅट्रॉसिटी बाबत कठोर कायदा करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करणारे मोदी व भाजप मराठ्यांच्या आरक्षणासाठी हे करायचं नावही घेत नाहीत. मराठा हिंदू नाहीत का? भाजपातील एकही मराठा नेता मोदींकडे अशी मागणी करायला धजावत नाही,उलट मराठा आंदोलन कसे पेटेल व त्याचा राज्यातील सत्ताधार्यांना कसा उपद्रव होईल यासाठी या पक्षातील मराठा नेते उतावीळ झालेले पहायला मिळत आहेत. राजकीय स्वार्थासाठी आंदोलनात मराठा समाजाची किती हाणी होईल आणि त्यातून खरंच समाजाला आरक्षण मिळेल का याचा यत्किंचितही विचार ही मंडळी करीत नाहीत याचे नवल वाटते. राजकीय लाभापुढे समाज इतका क्षुल्लक ठरतो!!
असंच पदोन्नती तील आरक्षणांचंही आहे.सरकारी नोकरीत बढती देताना SC,ST आणि काही ओबीसींना आरक्षण देण्याची गरज नाही असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला व या निर्णयास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. असेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे अतिरिक्त राजकीय आरक्षणही सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले असल्याने आमच्या हातात काही नाही अशी रोज बोंब ठोकणारे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पदोन्नती आणि राजकीय ओबीसी आरक्षण प्रकरणी मात्र न्यायालयांचे निर्णय कसे डावलता येतील यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.काँग्रेसने तर यासाठी प्रसंगी राज्यातील सत्तेतून बाहेर पडू इतकी टोकाची भूमिका घेतली आहे.हाच कॉंग्रेस पक्ष मराठा आरक्षणाच्या बाबतीत का इतकी कठोर भूमिका घेत नाही? नितीन राऊत, वडेट्टीवार, भुजबळ, वर्षा गायकवाड, आदी स्वजातीसाठी मराठा समाजाच्या विरोधात थेट भूमिका तर घेत आलेच आहेत, त्यापुढे जाऊन न्यायालयाच्या निर्णयासही हे लोक जुमानत नाहीत. हे नेते जसे यांच्या जातींच्या विषयावर बांधिलकी ठेवतात तसा कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेत एकही मराठाभिमानी नेता नाही? कि या तिन्ही पक्ष व पक्षांतील नेत्यांनी मराठा समाजाला खिशात घालून ठेवले आहे!
पदोन्नतीबाबत अजीत दादा पवारांनी न्यायालयाच्या निर्णयाच्या समर्थनात भूमिका घेतली खरी, मात्र तीही कुठपर्यंत टिकेल त्यांनाच माहीत!अजित दादांबरोबर तिन्ही पक्षांतील इतर एकाही मराठा, खुल्या प्रवर्गातील आमदार, खासदाराने, कोण्या नेत्याने एक शब्दही बोलू नये? आणि यांना बोलायचे तरी काय आहे, फक्त न्यायालयाच्या निर्णयाचे समर्थन करायचे आहे,स्वतःच्या समाजाच्या हिताची एवढीशी भूमिका घ्यायला जे कचरत असतील त्यांना व त्यांच्या पक्षाला समजाने आपले का म्हणावे?
वरील सर्वच विषयांचे तटस्थपणे विश्लेषण केल्यास आपल्या हे लक्षात यायला हवे कि,सर्वच प्रमुख राजकीय पक्ष मराठ्यांना गुलाम समजत आहेत.मराठ्यांचा वापर कसा करून घेता येईल, मराठ्यांच्या आडून राजकारण कसं साधता येईल,मराठ्यांना कसं झुंजायला लावता येईल याचीच गणितं करण्यात राजकीय पक्ष व नेत्यांना स्वारस्य आहे. मराठा समाजातील लोकांना राजकारणाचे वेड आहे, त्या वेडापायी हे लोक समाजाच्या प्रश्नांसाठी कधीच एक होऊ शकत नाहीत,राजकिय गुलामगिरी करण्यातच मराठा समाज धन्यता मानतो अशी समाजाबाबत धारणा झाली आहे.
मराठा बांधवांनो, केव्हा तरी आपण समाजाच्या या अवस्थेचा गांभीर्यपूर्वक विचार करणार आहोत की नाही? जोपर्यंत मराठा समाजातील लोक आपल्या जातीच्या प्रश्नांबाबत राजकीय नेते व पक्षांना जबाबदार धरीत नाहीत व त्यांना जाब विचारणार नाहीत,आणि प्रसंगी मतदानातून धडा शिकविण्याची भूमिका घेणार नाहीत तोपर्यंत समाजाची वाताहत थांबणार नाही. हात जोडून विनंती आहे, विचार करा.🙏🙏🙏🙏
जय शिवराय!
(संजीव भोर पाटील हे शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. संपर्क ९९२१३८११८१)