मुक्तपीठ टीम
नाशिकचा आगामी महापौर शिवसेनेचाच असणार, असा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याशी त्यांची नुकतीच चर्चा झाली. त्याभेटीनंतर राऊतांनी काढलेल्या “आमचं ठरलंय…!” या सूचक उद्गारांना महत्वाचं मानले जात आहे.
आगामी नाशिक महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी यांच्या उपस्थित भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिवबंधन हाती बांधले. भाजपच्या एकूण ५० महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
नाशिकमध्ये संजय राऊत यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी संवाद साधला. नाशिकच्या शिवसेना कार्यालयात आल्यावर, “आता सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयात आल्यासारखं वाटतंय”, अशा भावना व्यक्त केल्या. काल राष्ट्रवादीचे नेते तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी भेट झाली. महापालिकेविषयी चर्चा झाली, ती इथे कशी सांगणार, असं राऊत म्हणाले. नाशिकमध्ये शिवसेनेचा महापौर, आमचं ठरलंय, असंही त्यांनी सांगितले.
राज्यपाल राजकीय दबावाखाली!
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजकीय दबावाखाली काम करत असून राजभवनाचा वापर राजकारणासाठी होतोय, असा आरोप संजय राऊत यांनी केला. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नाही, असे असले तरी राज्यपाल आणि सरकारचं शीत युद्ध नाही तर खुलं युद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची योग्य चौकशी होणार!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची योग्य चौकशी होईल. यात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले असल्याने कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असेही संजय राऊत यांनी बजावले.