मुक्तपीठ टीम
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सकाळीच भाजपा नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर विक्रांत वाचवण्यासाठीच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपांचे क्षेपणास्त्र सोडले आहे. भाजपा आता सोमय्या कुठे आहेत, ते का सांगत नाही, असा प्रश्न विचारत त्यांनी सोमय्यांना वाचवण्यासाठी बनावट पुरावे तयार केले जात असल्याचा आरोप केला. राजभवनात जुन्या तारखांनी बनावट नोंदी तयार करण्याच्या काहींचा प्रयत्न आहे. राजभवनने तसे करू नये, तसे केले गेले तर राजभवनची उरली-सुरली अब्रूही धुळीस मिळेल, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.
किरीट सोमय्या मुलासह फरारी झाला आहे. न्याय यंत्रणेवर दबाव आणुन सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात हे ठग आहेत. न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्र तयार केली तरी सत्याचाच विजय होईल. प्रश्न इतकाच की. हे दोन ठग कोठे आहेत? मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहित ?
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 11, 2022
सोमय्यांवर राऊतांचे आरोपांचे क्षेपणास्त्र
आर्थिक गुन्हे शाखा जबाब नोंदवणार!
- विक्रांतला वाचवण्याच्या नावावर मोठा घोटाळा झाला आहे. किरीट सोमय्या, त्यांचा मुलगा नील सोमय्या यांनी सेव्ह विक्रांत मोहीम चालवत संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून पैसा गोळा केला आहे.
- हा संपूर्ण घोटाळा खूप मोठा आहे. त्यामुळेच या घोटाळ्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. माझ्या मते उद्यापासून जबाब नोंदवण्यास सुरुवात होईल.
भाजपाने सांगावे कुठे आहेत सोमय्या बाप-बेटे?
- माझा प्रश्न भाजपाला आहे, हे दोघे बाप-बेटे गेलेत कुठे आहेत? ते गेले तरी कुठे? कुठे गायब झालेत? भाजपाचे नेते काहीच का बोलत नाहीत? जनतेचा पैसा, देशाचा पैसा लुटून नेला आहे.
राजभवनने जुन्या नोंदी करु नये…
- या दोघांचे अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न सुरु आहेत. जामीन मिळाला तरच हे पुढे येतील.
- ते होत नसल्याने ते गायब आहेत. ते परदेशातही पळू शकतात.
- त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करणे गरजेचे आहे.
- त्यांचे साथीदार बनावट पुरावे तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
- माझा राजभवनला इशारा आहे, तुम्ही आता तसे काही करु नका. तुमची उरली-सुरली अब्रूही धुळीस मिळेल.
- कारण खूप प्रयत्न सुरु आहेत.
मुंबई पोलीस पकडून आणतील!
- मला खात्री आहे, मुंबई पोलीस हे आरोपी जेथे आहेत, तेथून त्यांना पकडून आणतील.
- जनतेचा-देशाचा पैसा यांनी लुटला आहे.
- तो वसूल केला जाईल.