मुक्तपीठ टीम
पूरग्रस्त चिपळूणमधे राष्ट्र सेवा दलाच्या मुंबई टीमची औषध फवारणी मोहिम सुरू आहे. मुंबईतील मालाड मालवणीतील सेवादल संघटक साथी निसार अली सय्यद यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम सुरू झाली आहे. जेष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या मोहिमेचा आरंभ चिपळूणमधील डीबिजे महाविद्यालयाचा कँपस व इमारत सॅनिटाईज करुन केला गेला. या प्रसंगी युवराज मोहिते, राष्ट्र सेवा दल चिपळूणचे जिल्हाध्यक्ष रमाकांत सकपाळ,अनिल काळे, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे सरचिटणीस राजन इंदुलकर हे उपस्थित होते.
कोरोनाकाळात मुंबईतील मालाड मालवणीमध्ये Sanitization मोहिम चालवणारे निसार अली सय्यद यांच्या नेतृत्वाखाली मालवणी व मुंबईतील आठ जणांची टीम चिपळूण शहर व आसपासच्या गावांत, गर्दीच्या ठिकाणी ही मोहिम राबवत आहे. राष्ट्र सेवा दल मुंबईचे संघटक महादेव पाटील व पूरग्रस्त मदतकार्यासाठी महिन्याभराच्या अवधीत तिसऱ्यांदा चिपळूणला गेलेले राष्ट्र सेवा दल गोरेगावचे मनोज खराडे,मनोज परमार, मारुती झगडे,जाफर शेख,अमीन शेख,गणेश तिरावा हे ही या मोहिमेत सामिल झाले आहेत.
चिपळूणचे प्रांत प्रवीण पवार,नायब तहसीलदार टी.एस. शेजाळ यांनी राष्ट्र सेवा दलाच्या या मदत कार्याचे कौतुक केले आहे..
कोरोना आणि मलेरियापासून काही अंशी तरी चिपळूण वासियांना या मोहिमेमुळे दिलासा मिळेल असं मत राष्ट्र सेवा दलाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रमाकांत सकपाळ यांनी व्यक्त केलं.