मुक्तपीठ टीम
माझी वसुंधरा अभियानात अमृत गटामध्ये सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. आज मुंबईतील शानदार कार्यक्रमात महापौर सुर्यवंशी आणि उपायुक्त राहुल रोकडे यांनी पुरस्कार स्वीकारला. या यशाबद्दल आयुक्त नितीन कापडणीस यांनी जनतेचे आभार मानले आहेत.
माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाचे संबंधित पंचतत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली होती. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात आले होते. या स्पर्धे अंतर्गत अमृत गटांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अमृत शहरांमध्ये सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
हे पारितोषिक वितरण आज ५ जून २०२२ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते टाटा थिएटर, एन. सी. पी. ए., नरिमन पॉईंट मुंबई येथे करण्यात आले. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपायुक्त राहुल रोकडे, सिटी कोऑर्डिनेटर वर्षा चव्हाण, पर्यावरण अभियंता वैष्णवी कुंभार उपस्थित होते.