मुक्तपीठ टीम
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्यावतीने आयोजित महालसीकरणात मोहिमेत पहिल्या दिवशी ११,७८५ जणांनी आपला डोस घेतला. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी आरोग्य यंत्रणेने चोख नियोजन केले होते. उद्या शुक्रवारीही महापालिका क्षेत्रात महालसीकरण होत असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नोडल ऑफिसर डॉ वैभव पाटील यांनी केले आहे.
महापालिका क्षेत्रात सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या विशेष महालसीकरण मोहिमेत १९,२५५ नागरिकांनी पाहिला डोस घेतला होता. या नागरिकांच्या पहिल्या डोसची मुदत आज संपल्याने त्यांच्यासाठी महापालिका क्षेत्रात आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार ९ आणि १० डिसेंबर या दोन दिवशी विशेष महालसीकरण मोहीम आयोजित केली होती. या मोहिमेत गुरुवारी एकूण ८६ केंद्रावर पहिल्या दिवशी ३४५१ नागरिकांनी पहिला तर ८३३४ नागरिकांनी आपला दुसरा डोस घेतला. महालसीकरणच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यासाठी अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ सुनील आंबोळे, डॉ रवींद्र ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल ऑफिसर डॉ वैभव पाटील, सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांनी विशेष मेहनत घेतली आहे. शुक्रवारी महालसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.