संदीप जगताप
२००० चा ११ वीचा पिंपळगाव कॉलेजचा वर्ग आठवतो. मराठी चं लेक्चर म्हटलं की सगळा वर्ग गच्च भरलेला. कारण लेक्चर बोंडे मॅडमचं असायचं.. मॅडमने जीव ओतून अन इतक्या हलक्या फुलक्या शब्दात शिकवलं की ते शब्द काळजात कायमचे घर करून बसलेत.२० वर्षानंतर ही आज तितकेच ताजेतवाने वाटतात.
आज १२ -१३ वर्षाने मॅडमला भेटायला गेलो.माझ्या सोबत प्रा.विष्णू चौधरी, प्रा.दिनेश आहिरे होते,.खरं म्हणजे माझ्या सिडको कॉलेजच्या अगदी जवळ त्या राहतात पण माझ्या कडून विलंब होत गेला.मॅडमने ज्या आपुलकीनं स्वागत केलं त्यामुळे इतक्या दिवस जवळ असून मॅडमला भेटलो नाही याची माझीच मला लाज वाटली.
मॅडम तुमच्या सारखं मला आनंददायी शिकवता येत नाही. याचं नेहमी दुःख वाटतं.मी खंत व्यक्त केल्यावर मॅडम म्हटल्या..तसं काही नसतं संदीप ..शिक्षकाने मुलांना भरपूर ज्ञाना बरोबर प्रेम द्यावं.मुलं आपली वर्गात वाट बघत बसली पाहिजे. इतकं आपुलकीनं बोलावं.वर्गात हसऱ्या चेहऱ्याने जावं.असा लाखमोलाचा सल्ला दिला.
तासभर मॅडम सोबत मारलेल्या गप्पांमध्ये त्या काळातील खूप घटनांना उजाळा मिळाला.कोणता मुलगा काय करतो..कोणती मुलगी काय करते.?सगळं मॅडमला माहीत आहे.मॅडमला सगळे फोन करतात.मॅडमला आजही भेटायला येतात.मला आश्चर्य वाटलं.तुझा कोनाकोणाशी संपर्क आहे…? मॅडमने विचारल्यावर माझा फोन हरवला तेव्हा सगळे नंबर गेले.मी कारण सांगितल्यावर मॅडमने त्यांचा फोनच माझ्याकडे दिला. सगळ्या मुला – मुलींचे नंबर यात आहे तुला हवे ते घे.मी बरेच नंबर त्या फोन मधून घेतले.
आज मी मॅडमकडे एक आग्रह धरला.आम्ही सगळे वर्गात बसू अन मॅडम तुम्ही मराठीचं एक लेक्चर घ्यायचं.आम्हाला पुन्हा २० वर्ष मागं जायचंय. अन तुमचं लेक्चर ऐकायचंय .मॅडम हो म्हटल्या पण तुम्ही सगळे सहकुटुंब एकत्रीत माझ्या रिसॉर्ट वर या. त्रंबकरोडला आमचं स्वतःचं मोठं रिसॉर्ट आहे.तिथंच मी लेक्चर घेईन अन एक गेटटुगेदर होईल. तुमच्या सगळ्यांची सहकुटुंब व्यवस्था आई म्हणून मी करेन ..फक्त तुम्ही एकमेकांशी बोलून तारीख ठरवा.बाकीची काळजी करू नका.शिक्षकाने विद्यार्थ्यांशी कसं नातं ठेवावं .याचं आदर्श उदाहरण म्हणजे बोंडे मॅडम आहे.
मॅडमला भेटायला जाताना वडाचं झाड आम्ही भेट म्हणून निलं होतं.मॅडमने ते झाड स्वीकारताना ममत्वाने डोक्यावरून हात फिरवला.प्रेमाने जवळ घेतलं.खूप लहान झाल्या सारखं वाटलं.मी म्हटलं मॅडम एक दिवस घरी या.. नक्की येते म्हटल्या. मी म्हटलं तुम्हाला मोठी गाडी घेऊन येतो घ्यायला .तेव्हा त्या म्हटल्या नाही.तुझ्या मोटारसायकलवर बसून येईल. मी ७३ वर्षाची असले तरी ठणठणीत आहे.मला फार आनंद झाला. मॅडमला आमच्या घरातील सगळ्यांनाच भेटायचय. कारण मॅडमचे संस्कार, विचार व प्रेम यावरच माझी जडणघडण होत गेली. याची घरतील सगळ्यांणाच जाणीव आहे.मॅडम आम्हाला सोडायला बाहेर आल्या तेव्हा कळत न कळत त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आनंदाचं की दुःखाचं माहीत नाही. पण मन मात्र माझं ही गलबलून आलं होतं. जड पाऊलानेच तिथून निघालो..पण प्रेमाचा.. जिव्हाळ्याचा..आपुलकीचा..व प्रचंड ऊर्जेचा जिवंत झरा घेऊनच..!!
बोंडे मॅडम ..बोंडे मॅडम आहे..तेव्हाही ..आजही अन उद्याही ग्रेटच..
प्रदेशाध्यक्ष , स्वाभिमानी शेतकरी संघटना