मुक्तपीठ टीम
स्वराज्य संघटनेच्या विस्तारासाठी राज्यभर संभाजीराजे छत्रपती दौरा करत आहे. गेले तीन दिवस संभाजीराजे छत्रपती हे नाशिकच्या विविध भागात शाखा उद्घाटन करत सभा घेत होते. याच काळात कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतल्याने संभाजीराजे यांनी कार्यकर्त्यांना घेऊन मिसळ खाण्याचा बेत आखला होता. नाशिकचे प्रसिद्ध मिसळीच्या हॉटेलात जाऊन राजे यांच्यासह त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मिसळीवर ताव मारला. नाशिकची मिसळ सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्यातच संभाजीराजे हे स्वतः खवय्ये आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना स्वतः संभाजीराजे मिसळ खायला येणार असल्याने मोठा आनंद झाला होता. त्यातच संभाजीराजे यांनाही नाशिकची मिसळ प्रचंड आवडली असल्याने त्यांनी कार्यकर्त्यांना आग्रह करत मिसळ स्वतः वाढली. विशेष म्हणजे संभाजीराजे यांनी मिसळ स्वतः वाढायला घेतल्याने कार्यकर्त्यांना हा क्षण सुखावणारा होता. संभाजीराजे यांचा हा साधेपणा पाहून हॉटेल मालकांना देखील मोठा आनंद झाला होता.
नाशिकच्या गंगापूर परिसरात असलेल्या साधना मिसळ या हॉटेलात संभाजीराजे छत्रपती आल्याने हॉटेलच्या संचालकांना मोठा आनंद झाला होता. संभाजीराजे छत्रपती आणि प्रवक्ते डॉ धनंजय जाधव, करण गायकर यांच्यासह राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिसळ खाण्यासाठी पोहचले होते.
स्वराज्य संघटनेचे काम आणि इतर सर्व बाबी विसरून संभाजीराजे यांनी मिसळबद्दल आणि एकूणच कामाच्या व्यतिरिक्त चर्चा करत पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. संभाजीराजे यांचा साधेपणा यावेळी पुन्हा एकदा बघायला मिळाला, दोन दिवसापूर्वी नाशिकच्या सर्किट हाऊस येथील किचनमध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी नाष्टा बनविला होता.