मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र राज्य शासनाशी तसेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयाशी व समग्र शिक्षा योजनेशी https://samagrashiksha.org/ या संकेतस्थळाचा तसेच या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेचा कोणताही संबंध नाही, असे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक, राहुल द्विवेदी यांनी कळविले आहे.
https://samagrashiksha.org/ या संकेतस्थळावर Sarva Shiksha Abhiyan Recruitment Teacher, SSA Lab Technician, SSA Computer Teacher. Samagra Shiksha Abhiyan Recruitment Karyalaya Staff, Chaprasi या पदांची भरती प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून येत आहे. हे संकेतस्थळ शासनाचे नाही. तसेच या भरती प्रक्रियेचा राज्य शासनाशी तसेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयाशी कोणताही संबंध नाही. तथापि, या भरती प्रक्रियेच्या संकेतस्थळावरील जाहिरातीमुळे उमेदवारांची दिशाभूल/ फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व शिक्षा अभियान केंद्र पुरस्कृत योजनेची सन २००२-०३ पासून सन २०१७-१८ पर्यंत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिनस्त महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद शिक्षण परिषद, मुंबई या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यभर अंमलबजावणी करण्यात येत होती.
सद्य:स्थितीत सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षक शिक्षण या पूर्वाश्रमीच्या केंद्र पुरस्कृत योजनाच्या एकत्रिकीकरणातून दि. ०१/०४/२०१८ पासून समग्र शिक्षा योजनेची अंमलबजावणी या कार्यालयामार्फत राज्यात सुरू आहे. त्यामुळे सन ३१/०३/२०१८ नंतर सर्व शिक्षा अभियान या योजनेची वेगळी अंमलबजावणी राज्यात सुरू नाही, असेही यासंदर्भातील पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.