मुक्तपीठ टीम
मुंबईच्या पूर्व उपनगरातील साकीनाका परिसरातील एका दुकानाला आज सकाळी भीषण आग लागली. खैरानी रोडवरील या बैठ्या दुकानाची आग राख झाली. या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवले. महापौर किशोरी पेडणेकर यांना आगीची माहिती मिळताच त्यांनी तेथे धाव घेतली.
खैरानी रोडवरील रहिमानी हॉटेललगत असलेल्या न्यू इंडिया मार्केटमधील बैठ्या दुकानाला सकाळी आग लागली. या आगीत त्या दुकानातील माल खाक झाला. तसेच दुकानातील तीन जण ३५% पेक्षा जास्त भाजले आहेत. त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीच्या घटनेवरून असे लक्षात येते की, दाटीवाटीच्या जागेमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी याठिकाणी योग्य प्रकारे काळजी घेतलेली नसल्याने आगीच्या गंभीर घटना तशा नेहमीच्याच झाल्या आहेत.
घटना समजताच मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी घटनास्थळाकडे तात्काळ धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून आगीच्या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यावेळी म्हणाल्या की, या आगीच्या घटनेवरून असे लक्षात येते की, दाटीवाटीच्या जागेमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी याठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका याबाबत कुठल्याही प्रकारे दुर्लक्ष न करता फायर ऑडिट करून संबंधितांना वेळोवेळी नोटीस देत असल्याचे महापौरांनी सांगितले. नोटीस दिल्यानंतरही संबंधित व्यावसायिकांनी आग प्रतिबंधक उपकरणे बसविणे गरजेचे आहे. आपण ज्या ठिकाणी राहतो तसेच आपला व्यवसाय ज्याठिकाणी आहे ती जागा, ती इमारत आग प्रतिरोधक असली पाहिजे.
प्रत्येक व्यावसायिकाने ही माझी जबाबदारी आहे असे समजून वागले तरच अशा प्रकारच्या घटनांमध्ये नागरिकांचे जाणारे नाहक बळी वाचू शकतील असे महापौरांनी सांगितले.