मुक्तपीठ टीम
सयाजी शिंदे…नामवंत अभिनेते. पण त्यापेक्षाही त्यांची मोठी ओळख म्हणजे जिवंत मनाचा माणूस. सह्याद्री देवराईच्या माध्यमातून झाडं जगवणारा, झाडं वाढवणारा, निसर्ग धर्म जोपासणारा! पुनर्जन्म दिलेल्या वडासोबतचा व्हॅलेंटाइन डे सध्या गाजतोय. ग्लॅमरच्या दुनियेत माणूसपण विसरून त्यातच गुंग झालेले अनेक असतात, पण सयाजी शिंदे हे अभिनेते म्हणजे आपलं मन जिवंत राखत सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून वावरणारा अस्सल नायक! निसर्गाशी नातं जपण्यासाठी त्यांचे सह्याद्री देवराईच्या माध्यमातून चाललेले प्रयत्न तर ते निसर्ग नायक असल्याचंच दाखवून देणारे!
वडाच्या पुनर्जन्माचा आनंद सोहळा!
साताऱ्यात थाटात निघालेली एक मिरवणूक सोमवारी सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ठरली. खरंतर अवघ्या राज्याचं. माध्यमांचं. सर्व निसर्गप्रेमींचं तर नक्कीच! ती मिरवणूक कोणत्याही राजकीय नेत्याची नाही. तर अभिनय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवतानाच जिवंत मनानं सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या सयाजी शिंदेंसाठी काढण्यात आली होती. हलगीच्या तालावर सारेच आनंदोत्सव साजरा करत होते तो वडाच्या झाडाच्या पुनर्जन्माचा. सह्याद्री देवराईच्या पर्यावरणारक्षणासाठीच्या पुकारलेल्या युद्धात एका झाडाला वाचवण्याची लढाई जिंकल्याचा तो विजयोत्सव होता.
पुण्याचा वड, साताऱ्यात जगला!
पुण्याच्या हडपसरमधील एक व्यक्ती अडचण होत आहे, असे समजून वडाचं झाड कापायला निघाला होता. वडाचं झाड कापायला निघालेल्या त्या व्यक्तीकडून सह्याद्री देवराईनं शंभर वर्षे वयाचा वटवृक्ष ताब्यात घेतला. मोठ्या ट्रकमधून साताऱ्यात म्हसवेतील गोळीबार मैदानात आणून त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्रोपण केले गेले. या वटवृक्षाला जीवदान मिळून पालवी फुटली आहे.
साताऱ्यातील ‘दुर्मीळ’ प्रयोग!
सह्याद्री पर्वतरांगांमधील पश्चिम घाटातील दुर्मीळ वनस्पती, वृक्ष आणि देशातील इतर राज्यांमधील ६०० हून अधिक दुर्मीळ वृक्षांच्या प्रजाती एकाच ठिकाणी लावण्याचा अनोखा प्रयोग साताऱ्यात सुरू आहे. “व्हॅलेंटाईन डे’ला वृक्षप्रेमी नागरिक, विद्यार्थी या सर्वांनी पालवी फुटलेल्या वटवृक्षाभोवती निसर्गावर प्रेमाचा उत्सव साजरा केला.
“सह्याद्री देवराई” या संस्थेला साताऱ्यात देवराई निर्माण करण्यासाठी म्हसवे (डी मार्टजवळ) येथे पोलीस गोळीबार मैदानाची काही जागा देण्यात आली आहे. मराठी, हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकाराने ही संस्था स्थापन झाली आहे. आता साताऱ्यासह महाराष्ट्रभर हरित महाराष्ट्रासाठीचं सह्याद्री देवराईचं काम वाढत आहे.
निसर्ग नायकाची विनम्रता!
आनंदोत्सवात सयाजी शिंदेंनी आपला मोठेपणा न सांगता पुण्याच्या त्या माणसाची अडचण विनम्रतेनं मांडली. ते म्हणाले, “आपला राष्ट्रीय वृक्ष असलेला वड अडचण होत आहे, असे समजून हडपसरची एक व्यक्ती तो कापायला निघाली होती. त्या व्यक्तीकडून आम्ही शंभर वर्षे वयाचा हा वटवृक्ष ताब्यात घेतला. मोठ्या ट्रकमधून साताऱ्यात गोळीबार मैदानात (म्हसवे) आणून त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्रोपण केले. या वटवृक्षाला जीवदान मिळून पालवी फुटली आहे.”
सोलापुरातही निसर्ग व्हॅलेंटाइन डे!
त्याचवेळी सोलापूरातही वृक्षवल्लींनसह व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यात आला आहे. वृक्षांचे मानवतेशी, श्वासाशी असलेले नाते चिरंतन राहावे म्हणून, या वटवृक्षासोबत अनोख्या पद्धतीने “व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यात आला. नामांकित अभिनेते सयाजी शिंदे हे सोलापूरच्या माढा तालुक्यातील रोपळे येथे आल्यानंतर रोपळे ग्रामस्थांनी सयाजी शिंदे यांची हलगी वाजवत घोड्यावरून मिरवणूक काढली. यावेळी सयाजी शिंदे यांना हलगी वाजविण्याचा मोह आवरला नाही. रोपळे येथे सह्याद्री देवराई प्रकल्प व रोपळे ग्रामस्थ यांच्या वतीने दहा झाडे लावण्यात आली आणि सयाजी शिंदे यांच्या हस्ते फित कापून लोकार्पण सोहळा व अनोखा व्हेलेटाईन डे साजरा करण्यात आला.
सयाजी शिंदे – निसर्ग नायक!
सयाजी शिंदे यांच्या “सह्याद्री देवराई’ संस्थेने संपूर्ण राज्यभरात वृक्षारोपणाचा ध्यास घेतला आहे. राज्यभरात आतापर्यंत साधारण २२ देवराई, एक वृक्ष बॅंक, १४ गडकिल्ले व राज्यात अन्य ठिकाणी चार लाखांपेक्षा अधिक वृक्षांचे रोपण केले आहे. भविष्यातही गावोगावी सह्याद्री देवराई अशाच बहरतील आणि पडद्यावरचा एक नायक निसर्गरक्षक महानायक म्हणून आपल्या मनावर राज्य करेल, एवढं नक्की!
पाहा व्हिडीओ