मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणारे प्रकल्प एकापाठोपाठ महाराष्ट्राबाहेर जात आहेत. वेदांता फायरफॉक्स, टाटा एअरबस प्रकल्पापाठोपाठ नागपूरच्या मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्पही हैदराबादला गेला आहे. जमीन मिळवण्यास दिरंगाई झाल्यामुळे हा प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे.
सॅफ्रन प्रकल्प हैदराबादला का गेला?
- सॅफ्रन कंपनी ही फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी आहे.
- ही कंपनी विमान तसंच रॉकेटचे इंजिन दुरुस्ती आणि देखभालीचे काम करते.
- ही कंपनी मिहानमध्ये येण्यास उत्सुक होती.
- गेल्या दोन वर्षापासून नागपुरच्या मिहानमध्ये प्रकल्पासाठी जमिनीची चाचपणी करत होती.
- मात्र, त्यांना आवश्यक तशी जमीन या ठिकाणी उपलब्ध झाली नसल्याने आणि सरकारच्या दिरंगाईमुळे हा प्रकल्प हैदराबादला गेला आहे.
- दरम्यान, याबाबत अद्याप राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
पाचशे ते सहाशे कुशल कामगारांना रोजगार मिळणार होता!!!
- सॅफ्रन कंपनी नागपूरच्या मिहानमध्ये विमान इंजनाच्या देखभाल दुरुस्तीचा युनिट टाकणार होती.
- वर्षाला इथे २५० विमानांची इंजन दुरुस्ती व देखभाल केली जाणार होती.
- त्यासाठी कंपनीची १ हजार ११५ कोटींची प्राथमिक गुंतवणुकीची तयारी होती.
- या प्रकल्पाच्या माध्यमातून पाचशे ते सहाशे कुशल कामगारांना रोजगार मिळणार होता.
- मात्र सरकारच्या दिरंगाईमुळे हा प्रकल्प हैदराबादला गेला.
- कंपनीचे सीईवो यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन प्रकल्प हैदराबादला हलवण्याची माहिती दिली आहे.
विरोधकांची सरकारवर टीकेची झोड-
- एकापाठोपाठ तीन मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे सराकरवर जोरदार टीकेची झोड सुरु आहे.
- सत्तेच्या हव्यासापोटी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वातावरण अस्थिर केलं असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. तसेच प्रकल्प राज्याबाहेर जाणे म्हणजे हा राजकीय करंटेपणा आहे. सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राच्या जनतेचं सरकारनं नुकसान केल्याचे लोंढे म्हणाले.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारवर टीका केली. महाराष्ट्रात जे काही चाललं आहे ते बघून दु:ख वाटत असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.