मुक्तपीठ टीम
उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाबाहेरील स्फोटके असलेल्या स्कॉर्पियो गाडीप्रकणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना न्यायालयाने दहा दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवले आहे. ज्या प्रकरणाची चौकशी वाझे करत होते त्याच प्रकरणात ते आरोपी झाले असून त्यांची आता कसून चौकशी करण्यात येणार आहे. वाझेंसोबत आणखी कोण या कटात सहभागी होते, त्याची माहिती मिळवण्यासाठी चौकशी करण्यासाठी
एनआयएच्या वकिलांनी सचिन वाझे यांच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.
पुढच्या काही दिवसांत एनआयए सचिन वाझे यांच्याकडून कोणती माहिती बाहेर काढणार, त्यावर बरेच काही अवलंबून असेल. आतापर्यंतच्या चौकशीत सचिन वाझे यांनी एनआयएला चौकशीत सहकार्य केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बरीच खळबळजनक माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे.
एएनआयला अंबानींच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवण्याच्या कटात आणखीही काही आरोपी सामील असावे, असा संशय आहे. त्यामुळेच एनआयएच्या कार्यालयात सचिन वाझे नेतृत्व करत असलेल्या सीआययू युनिटमधील चार अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे. यापैकी वाझेंचे सहकारी रियाझ काझी यांची पाच तासांपेक्षा अधिक काळापासून चौकशी सुरु आहे. त्यामुळे आता एनआयए आता आणखी काही पोलीस अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेणार का, हे पाहावे लागेल.