मुक्तपीठ टीम
उद्योगपती मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणाचा तपास करताना एनआयएला रोजच नवी धक्कादायक माहिती मिळत आहे. वाझेंशी संबंधित काही कागदपत्रे तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहेत. यामध्ये मुंबई पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा उल्लेख आहे. त्यांची नावे आणि रकमांसह असलेली यादीच एनआयएच्या हाती लागली आहे
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या भूमिकेच्या चौकशीसंदर्भात एनआयएने याप्रकरणी गुरुवारी गिरगाव भागातील एका क्लबवर छापा टाकला होता. त्यावेळी पथकाला एक डायरी सापडली होती. त्यामध्ये काही महत्त्वाची आकडेवारी लिहून ठेवल्याचे समोर आले आहे. ती आकडेवारी काही पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या लाचेसंबंधी असून, महिनावार ती मांडण्यात आली आहे, असे एनआयए पथकाचे म्हणणे आहे. ७ एप्रिलपर्यंत वाझे एनआयएच्या ताब्यात आहेत. एकप्रकारे ती लाचेची यादीच आहे.
सीबीआयकडे कागदपत्रे दिली जाणार
एनआयएकडून लवकरच ही माहिती जाहीर केली जाण्याचीही शक्यता आहे. परंतु त्याआधी त्या क्लबमालकाची कसून चौकशी होणार आहे. त्यामुळे गरज भासल्यास हे दस्तावेज आर्थिक तपासासाठी प्राप्तिकर विभाग किंवा सीबीआयकडेदेखील सोपवले जातील, असे पथकातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
शिंदेंला क्लबमध्ये नोकरी लावली
या क्लबमध्ये वाझेंचा सतत वावर होता. त्यांनीच या क्लबमध्ये नरेश गौर आणि सहकारी आरोपी विनायक शिंदे यांनाही नोकरीला लावले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दोघेही सध्या एनआयएच्या ताब्यात आहेत.
कागदपत्रात काय आहे
- अधिकाऱ्यांनी सांगितले की, कागदपत्रात कार्यालये आणि पदांसह अधिकाऱ्यांची नावे आहे.
- नावांपुढे रकमेचा उल्लेख आहे, त्यांची यादी बनवली गेली आहे.
- अधिकाऱ्यांचा संशय आहे की कार्यालये आणि अधिकाऱ्यांच्या नावासमोर लिहिलेले पैसे लाच असू शकते, जी दरमहा दिली जात असावी.