मुक्तपीठ टीम
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसूलीचा आरोप करणाऱ्या पत्रानंतर आता सचिन वाझेंनी न्यायालयात एक लेटर बॉम्ब फोडला आहे. त्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी शरद पवार यांचे मतपरिवर्तन कऱण्यासाठी दोन कोटींची लाच मागितल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.
सचिन वाझेंच्या या लेटरबॉम्बचे लक्ष्य मोठे आहेत. त्यांनी अनिल देशमुखांवर नवा आरोप करतानाच त्यात शरद पवार, घोडावत नावाच्या व्यक्तीचा अजित पवारांचा निकटस्थ असा उल्लेख करत त्यांनाही वादाच्या भोवऱ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सर्वात मोठे लक्ष्य आहेत ते परिवहन मंत्री अनिल परब. त्यांच्यावर आरोप करण्याचा वाझेंच्या पत्रातील उद्देश ते ज्यांचे जवळचे आहेत, त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत प्रकरण पोहचवण्याचाच असावा, हे स्पष्ट आहे. आज सकाळी भाजपा नेते किरीट सोमय्यांनी दिलेली प्रतिक्रिया तसे स्पष्ट संकेत देणारी होती. त्यांनी स्पष्ट शब्दात हे प्रकरण मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत जाणार असल्याचे म्हटले होते.
क्लिक करा आणि वाचा काय म्हणाले होते भाजपा नेते किरीट सोमय्या
सचिन वाझे यांनी ३ एप्रिलला एनआयएच्या कोठडीत असतानाच लिहिलेल्या पत्रातील धक्कादायक आणि गंभीर आरोप पुढील प्रमाणे आहेत:
- शरद पवार यांनी त्यांना मुंबई पोलीसात पुन्हा रुजू करण्यास नकार दिला. त्यांना निलंबितच ठेवण्यास सांगितले. पण माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांना आश्वासन दिले की जर दोन कोटी रुपयांची व्यवस्था केली तर ते शरद पवार यांना समजवतील.
- सचिन वाझे यांनी दोन कोटींची रक्कम देण्यास असमर्थता व्यक्त केली, त्यावर देशमुख म्हणाले की सेवेत आल्यानंतर त्यांनी दोन कोटींची व्यवस्था करावी.
- यानंतर अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून सचिन वाझे यांना पुन्हा कामावर घेण्यात आले व मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या क्राइम इंटेलिजेंस युनिटचे प्रमुख केले गेले.
- परिवहन मंत्री अनिल परब यांनी मला सांगितले की एसबीयूटी (सैफी बुऱ्हानी) ट्रस्टविरोधात चौकशी सुरू आहे, या ट्रस्टच्या विश्वस्तांना माझ्या बरोबर मिटिंगमध्ये बसवा आणि ५० कोटी खटला संपवायला सांगा.
- मी अनिल परब यांना सांगितले की मला एसबीयूटी ट्रस्टमधील कुणालाही ओळखत नाही आणि मी या प्रकरणातील तपास अधिकारीही नाही, त्यामुळे हे शक्य होणार नाही.
- जानेवारी २०२१ मध्ये अनिल परब यांनी मला पुन्हा त्यांच्या सरकारी बंगल्यावर बोलावले आणि बीएमसीमध्ये काळ्या-यादीतील अशा ५० कंत्राटदारांना २ कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले. परब यांनी मला या कंत्राटदारांना सांगण्यास सांगितले की जर सर्वांनी दोन कोटी रुपये दिले तर त्यांचे सीआययूकडील प्रकरण कमजोर होईल.
- तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जानेवारी २०२१ मध्ये ज्ञानेश्वरी येथे आपल्या अधिकृत बंगल्यात भेटण्यासाठी बोलावले होते, असा दावाही वाझे यांनी पत्रात केला आहे. त्या बैठकीला अनिल देशमुख यांचे पी.ए. कुंदन देखील उपस्थित होते. वाझे यांच्या म्हणण्यानुसार देशमुख बैठकीत म्हणाले की, मुंबईत १६५० बार आणि रेस्टॉरंट्स असून त्यांच्याकडून दरमहा तीन ते साडेतीन लाख रुपये जमा करावे.
- वाझे दावा करतात की मी माझी असमर्थता व्यक्त केली आणि ते म्हणाले की ते १६५० बार आणि रेस्टॉरंट्समधून इतका पैसा गोळा करू शकत नाहीत.
- मी मिटिंगमधून बाहेर पडताच गृहमंत्री पी.ए. कुंदन यांनी मला सांगितले की जर तुला सेवेत राहायचे आहे तर त्यांना या प्रकारची खंडणी द्यावी लागेल.
- पण यानंतर मी कुंदननाही असे करण्यास नकार दिला.
- मीटिंगमधून परत आल्यानंतर मी संपूर्ण माहिती पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सांगितली. परमबीर सिंग यांनी मला असे कोणतेही बेकायदेशीर कृत्य करु नका असे सांगितले.
- आयुक्तांनी मला असे कोणतेही काम न करण्याचा कठोर आदेश दिला.
- यानंतर मी त्यांना सांगितले की पुढच्या काही काळात मला काही चुकीच्या कार्यात गुंतवले जाईल.