मुक्तपीठ टीम
अँटिलिया प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास एजन्सी (एनआयए) समोर मनसुख हिरेनशी संबंधित सर्व माहिती उघड केल्याचा दावा केला जात आहे. एनआयएच्या तपासातून नवी माहिती समोर आली आहे, निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझेंनी मनसुख हिरेनची हत्या केली आहे. मनसुख हिरेन हा अँटिलिया प्रकरणातला कच्चा दुवा ठरू शकतो असं सचिन वाझेंना वाटलं त्यामुळे वाझेंनी त्याची हत्या केली असाही दावा केला जात आहे. दरम्यान, काल रात्री ताब्यात घेतलेल्या महिलेने चौकशीत दिलेली माहिती नवे गौप्यस्फोट करणारी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मनसुख कच्चा दुवा ठरण्याची भीती भोवली
एनआयएच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाझे यांनी बॉम्ब अँटीलियाबाहेर लावण्याचा कट आखला होता. एटीएस आणि एनआयएसारख्या तपास यंत्रणांनी मनसुख हिरेनची स्कॉर्पिओ चोरीला कशी गेली याचा शोध सुरू केला. स्वतःला वाचवण्यासाठी वाझे यांनी त्यांनी मनसुखला तू गुन्हा मान्य करून टाक मी तुला सोडवेन असंही सांगितलं होतं. मात्र मनसुख हिरेन यांनी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ अँटेलियासमोर ठेवली आरोप आपल्या अंगावर घ्यायला नकार दिला. त्यामुळे सचिन वाझे यांनी रचलेला कट फसला.
गाडीच्या आरशावरील नंबरने दिला दुवा
वाझे यांनी या प्रकरणात बनावट सिम व नंबर प्लेट वापरत होते. अँटिलियाच्या बाहेरून जप्त करण्यात आलेल्या स्कॉर्पिओ कारचा चेसी नंबरही त्यांनी खरवडला, ज्यामुळे कारच्या मालकाचा शोध घेणे कठीण जाईल, असा त्यांचा हेतू होता. मात्र, त्यांचे स्कॉर्पियोच्या आरशावर अगदी बारीक अक्षरातील नोंदणी क्रमांकाकडे लक्ष गेले नाही. त्यामुळे एटीएसला मूळ मालकापर्यंत पोहचता आले. त्या मालकाने काही आर्थिक व्यवहारातून ती गाडी मनसुख हिरेनकडे असल्याचे सांगितले. त्यानंतर वाझे यांनी मनसुख हिरेनला सोडण्यासाठी एटीएसला सांगितले.
पुरावा नष्ट करण्याचा हेतू
एनआयएच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “सचिन वाझे यांना अशी भीती होती की मनसुख हिरेन इतर एजन्सींच्या चौकशीत सर्व सांगून टाकेल. हा एक कच्चा दुवा असेल, कारण त्याने जिलेटिनच्या काड्या लावण्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळेच सचिन वाझेंनी मनसुख हिरेनच्या हत्येचा कट रचला. तसंच मनसुख हिरेनने आत्महत्या केली आहे असंही त्यांनी भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदरच्या खाडीजवळ आढळला आणि या खुनाला वाचा फुटली.
सीसीटीव्हीतील ‘त्या’ रहस्यमय महिलेकडून नवे गौप्यस्फोट
सचिन वाझेंनी मुक्काम केलेल्या दक्षिण मुंबईतील आलिशान हॉटेलच्या सीसीटीव्हीत एक महिलाही टिपली गेली होती. काल रात्री एनआयए तिच्या घरी पोहचली. तिला ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली. त्या चौकशीत त्या महिलेने अनेक महत्वाची माहिती उघड केली असण्याची शक्यता आहे. ती माहिती नवे गौप्यस्फोट करणारी ठरु शकणारी असू शकते.