मुक्तपीठ टीम
गेले काही दिवस वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने त्यांना अटक केली आहे.
एनआयए कडून सचिन वाझे यांची शनिवारी दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. सचिन वाझे कंबाला हिल येथील एनआयएच्या कार्यालयात सचिन वाझे शनिवारी सकाळी साडे अकराला गेले. तिथे तब्बल १३ तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री त्यांना अधिकृत अटक करण्यात आली. आज त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.
मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांसह स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आली होती. या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या २८६, ४६५, ४७३, ५०६ (२), १२० ब आणि ४ (अ) (ब) (इ) तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.