मुक्तपीठ टीम
अंधेरी मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने येत्या ३ नोव्हेंबरला तिथे पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र ऋतुजा लटके या महापालिका कर्मचारी असून त्यांचा राजीनामा पालिकेने मंजूर केलेला नाही. याकारणाने लटके उमेदवारी अर्ज भरू शकत नसल्याने नवीन तिढा निर्माण झाला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून पालिकेने लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान ऋतुजा लटके यांना शिंदे गटात खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याच्याही बातम्या आहेत. एकंदरीतच ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आधी पक्षाचं नाव, चिन्ह यासाठी अडथळ्यांना तोंड द्यावं लागल्यानंतर आता उमेदवाराच्याबाबतीत नवे अडथळे निर्माण केले जात असल्याची चर्चा आहे. त्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाच असल्याचा आरोप, शिवसेनेकडून करण्यात येत आहे.
शिवसेनेसमोर मोठं आव्हान!
- अंधेरी पूर्व येथून शिवसेनेकडून रमेश लटके हे २०१९ मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते.
- काही महिन्यापूर्वी लटके यांचा मृत्यू झाला.
- यामुळे अंधेरी येथे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
- शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
- ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत अंधेरी येथील के ईस्ट उपायुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या अखत्यारीत नोकरी करत होत्या.
- त्यांनी महिनाभरापूर्वी नोकरीचा राजीनामा दिला आहे.
- मात्र पालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही.
- लटके यांचा राजीनामा मंजूर होत नाही, तोवर त्यांना निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरता येणार नाही.
- यामुळे लटके यांचा राजीनामा लवकर मंजूर करावा यासाठी शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत.
पालिकेचा नियम काय सांगतो?
- किमान सेवेची २० वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यालाच राजीनामा किंवा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज करता येतो.
- हा अर्ज तीन महिन्यांच्या कालावधीत कधीही मंजूर केला जावू शकतो, परंतु तीन महिन्यांमध्ये यावर कोणताही निर्णय न घेतल्यास आणि संबंधित कर्मचाऱ्याला याबाबत न कळवल्यास त्याचा अर्ज मान्य झाला असे गृहीत धरले जाते.
शिवसेना नेत्यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट!!
- शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनिल परब, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आदींनी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल आणि सामान्य प्रशासनचे सह आयुक्त मिलिन सावंत यांची भेट घेतली आहे.
- यावेळी लटके यांचा राजीनामा लवकर मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
- यावर संबधित अधिकाऱ्यांना या प्रकरणी कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
- ऋतुजा लटके या महापालिकेच्या कर्मचारी आहेत.
- त्यांनी राजीनामा दिलेला आहे.
- तो पालिकेने स्वीकारलेला नाही त्यामुळे त्या अर्ज भरू शकतात की नाही याबाबत पक्षाकडून कायदेशीरबाबी तपासल्या जात आहेत.
- त्यानंतर याचा निर्णय पक्ष घेईल.
ऋतुजा लटके यांना शिंदे गटाकडे वळवण्याच्या बातम्या
अंधेरीचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. स्थानिक शिवसैनिकांनी मशाल चिन्ह मिळाल्यावर मोठा जल्लोषही केला. मात्र, आता माध्यमांमध्ये त्यांना आपल्या गटात ओढण्याच्या बातम्या येत आहेत. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला रमेश लटके या आमच्या दिवंगत निष्ठावान आमदाराच्या पत्नी असणाऱ्या ऋतुजा लटके यांच्याविरोधात अफवा पसरवण्याचे धंदे सुरु आहेत. त्या निष्ठावान शिवसैनिक आहेत. त्यांनी राजीनामा दिल्यानंतरही तो न स्वीकारता त्यांच्या उमेदवारीत अडथळे आणले जात आहेत. पालिका अधिकारी कुणीतरी डोक्यावर पिस्तुल ठेवल्यासारखे दहशतीखाली दिसत आहेत. शिवसेना याविरोधात न्यायालयातही जाणार आहे.