मुक्तपीठ टीम
तीन हजार मीटरच्या स्टीपलचेस स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेल्या अविनाश साबळेने ५ हजार मीटर शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे. त्याने १३.२५ मिनिटांत शर्यत पूर्ण करून बहादूर प्रसादचा ३० वर्ष जुना विक्रम मोडला. बहादूरने १९९२ मध्ये हा विक्रम केला होता. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे झालेल्या या शर्यतीत अविनाशने १२ वा क्रमांक पटकावला, मात्र यादरम्यान त्याने राष्ट्रीय विक्रम केला. नॉर्वेच्या जेकबने १३ मीटर 2 सेकंदात शर्यत पूर्ण करून स्पर्धा जिंकली. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये १ हजार ५०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते.
अविनाश साबळे यांच्या नावावर ३ हजार मीटर स्टीपलचेसचा विक्रम
- सर्वात कमी वेळेत ३ हजार मीटर स्टीपलचेस पूर्ण करण्याचा विक्रम अविनाश साबळे यांच्या नावावर आहे.
- टोकियो ऑलिम्पिकमध्ये, अविनाश साबळेने ८:१८.१२ वेळेसह राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला, परंतु अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नाही.
- या स्पर्धेत त्याने सातवे स्थान पटकावले. याआधीही तीन हजार मीटर स्टीपलचेसचा विक्रम त्याच्या नावावर होता.
- साबळेने मार्च २०२१ मध्ये फेडरेशन कपमध्ये ८:२०.२० मिनिटांत शर्यत पूर्ण करून राष्ट्रीय विक्रम केला.
३० वर्षांपासूनचा जुना रेकॉर्ड मोडला
- महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेला अविनाश हा लष्कराचा शिपाई आहे.
- २७ वर्षीय तरुणाने बहादुर प्रसादचा राष्ट्रीय विक्रम मोडला, ज्याने १९९२ मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या स्पर्धेत १३:२९.७० मिनिटांत शर्यत पूर्ण केली.
- साबळेने तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम अनेकदा मोडला आहे.
- तिरुवनंतपुरममधील भारतीय ग्रॅंड प्रिक्स दरम्यान, त्याने ८:१६.२१ मिनिटांत शर्यत पूर्ण करून सातव्यांदा स्वतःचा विक्रम मोडला.
- १५ जुलैपासून अमेरिकेत होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी तो आधीच पात्र ठरला आहे.
भारतीय अॅथलेटिक्सचे मुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी सांगितले की, आशियाई क्रीडा स्पर्धेत अविनाशला ३००० मीटर स्टीपलचेस आणि ५ हजार मीटर शर्यतीत उतरवण्याची त्यांची योजना होती. दोन्ही स्पर्धांमध्ये पदक जिंकण्याची क्षमता त्याच्यात आहे. आशियाई खेळ १० ते १५ सप्टेंबर दरम्यान चीनच्या हांगझोऊ येथे होणार होते, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे ते २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत.