मुक्तपीठ टीम
राज्यसभा निवडणुकीचं मतदान सुरु असतानाच अफवांचा बाजारही जोरात आहे. खरंतर मतदानापूर्वीच अफवांचं वारं सुटलं. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऐनवेळी प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी मतांचा कोटा वाढवल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज असल्याच्या ब्रेकिंग चालल्या. अखेर शिवसेना नेते आणि या निवडणुकीतील एक उमेदवार संजय राऊत यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. त्यांनी भाजपावर चुकीच्या बातम्या पसरवण्याचा आरोपही केला.
कोणीही कोणावर नाराज नाही!
- संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दात मविआमधील नाराजीचा इंकार केला.
- भाजपाकडून कालपासून अशाप्रकारच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत.
- मविआच्या उमेदवारांना ठरलेल्या गणितानुसार मतं मिळतील.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्यावर अजिबात नाराज नाहीत. आताच माझी त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली.
- मी शरद पवार यांच्याशीही बोललो आहे.
- कोणीही कोणावर नाराज नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
राज्यसभा निवडणुकीसाठी काँटे की टक्कर, चुरस वगैरे केवळ भ्रम!!
- संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार पहिल्याच फेरीत निवडून येतील, असा दावा केला.
- संध्याकाळी सात वाजता चित्र स्पष्ट होईल.
- राज्यसभा निवडणुकीसाठी काँटे की टक्कर, चुरस वगैरे असल्याचा केवळ भ्रम आहे.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला १६९ आमदारांचा पाठिंबा आहे.
- आजच्या मतदानात हे आकडे स्पष्ट दिसतील.
- महाविकास आघाडीला ठरल्यापेक्षा जास्त मतं मिळाली तरी भाजपा नेत्यांना धक्का बसू नये, हीच अपेक्षा करतो.
यामुळे मुख्यमंत्री नाराज असल्याच्या चर्चा…
- राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना जिंकवून आणण्यासाठी एक-एक महत्त्वाचे असताना शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या भूमिकेत बदल केल्याची चर्चा होती.
- राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
- त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ४२ मतांचा कोटा राखून ठेवला होता.
- त्यानंतर उर्वरित मतं ही शिवसेनेला दिली जाणार होती.
- मात्र, आता राज्यसभा निवडणुकीला अवघे काही तास उरले असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या मतांचा कोटा ४२ वरून ४४ इतका करण्याचा निर्णय घेतला आहे.
- त्यामुळे शिवसेना उमेदवार संजय पवार यांची मतं कमी झाल्याची चर्चा सुरु झाली.
- शरद पवार यांनी ऐनवेळी भूमिका बदलल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रचंड संतप्त झाल्याच्या बातम्या सुरु झाल्या.
- त्यात काँग्रेसनेही धोका नको म्हणून सर्व ४४ मते इम्रान प्रतापगढी यांनाच देण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्याही आल्या.
- जाणकारांच्या उमेदवाराची मते नेहमीच आवश्यक मतांपेक्षा एक-दोन मते जास्त ठेवली जात असतात.
- तसेच दुसऱ्या पसंतीची मते ही सुद्धा महत्वाची भूमिका पार पाडतील.