तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट विश्लेषण
“गाय ही पूजनीय आहे. परंतु लिंचिंग करणारे गुन्हेगार आहेत. आम्ही कधीच त्यांचे समर्थन करत नाही. जर हिंदू असे म्हणतात की एकही येथे मुस्लिमान राहू नये, तर तो हिंदू नाही. गायीला हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं. पण जे दुसऱ्यांना मारत आहेत ते हिंदुत्वाविरोधात आहेत! अशांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली पाहिजे!!” सरसंघचालकांचं भाषण आज चर्चेचा विषय झाले आहे. उत्तरप्रदेशातील गाझियाबादमधील मेवाड कॉलेजमधील कार्यक्रमात त्यांनी मांडलेले विचार हे हिंदुत्वाशी इतर समाजघटकांना जोडण्याचा प्रयत्न करणारे तसेच उत्तरप्रदेशातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला बेरजेचे महत्व शिकवणारे असल्याचे मानले जाते.
सरसंघचालकांच्या उपदेशाचं महत्व
• उत्तरप्रदेशात पुढच्या वर्षी निवडणुका आहेत.
• कोरोनासंकटापासून भाजपा तेथे अडचणीत आल्याचं मानलं जातं,
• स्थानिक जिल्हा पंचायतींच्या निवडणुकांमध्ये सपा भाजपापेक्षा जास्त जागा निवडून आणण्यात यशस्वी ठरली होती. भाजपाच्या चाणक्यांनी सर्वात जागी विजय झालेल्या अपक्षांच्या हाती कमळ देऊन सर्वात जास्त जागी भाजपाची सत्ता आणली असली, तरी लोकमत तेवढंसं भाजपाच्या बाजूने नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
• त्यामुळे सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाला कसोशीनं प्रयत्न करावे लागणार आहेत.
• राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या यंत्रणेमार्फत जमीनीवरील वास्तव जाणून प्रयत्न सुरु केले आहेत.
• संघाच्या पदाधिकाऱ्यांची भाजपाच्या नेत्यांसोबत उत्तरप्रदेशात गेल्या महिन्यात बैठकही झाली.
• त्यानंतर दिल्लीतही तशीच एक बैठक झाली.
• या दोन बैठकीत बंगालमधील पराभवानंतर उत्तरप्रदेशातील सरकारच्या ढासळत्या प्रतिमेवर चर्चा झाली.
• त्या बैठकीतच भाजपासाठीची पुढील रणनीती ठरली असावी.
मुस्लिम मनातील पराकोटीचा संताप शमवण्याचा प्रयत्न!
• आता पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य हे भाजपाला नव्यानं बेरीज शिकवणारे आहे.
• उत्तरप्रदेशात देशाच्या इतर मोठ्या राज्यांपेक्षा मुस्लीम मतदार जास्त संख्येने आहेत.
• उत्तरप्रदेशातील मुस्लीम मतदारांपैकी एक मोठा घटक शिया मतदारांचा आहे.
• शिया हे सुन्नींच्या वर्चस्ववादामुळे भाजपाला आजवर साथ देत आले आहेत.
• लखनौसारखा मतदारसंघ भाजपाजवळ राहण्याचे ते एक महत्वाचं कारण मानलं जातं.
• योगी आदित्यनाथांच्या सत्ताकाळातील झुंडबळींसारख्या घटनांच्या आरोप, तिहेरी तलाक आणि अन्य निर्णयांमुळे हा मतदारही बिथरला असण्याची शक्यता आहे.
• तसेच भाजपासोबत नसलेला पण इतर धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये विभागलेला सुन्नी मतदारांचं भाजपाविरोधात सपा किंवा काँग्रेससारख्या एकाच पक्षाशी ध्रुवीकरण होणे भाजपासाठी तोट्याचे ठरु शकते.
• मोहन भागवतांसारख्या सरसंघचालकासारख्या सर्वोच्च पदावरील माणसाने झुंड बळी घेणाऱ्यांना गुन्हेगार म्हणणे हे मनातील पराकोटीचा संताप शमवणारे ठरु शकते.
हिंदुत्वावादी कार्यकर्त्यांनाही बेरजेचं महत्व शिकवणारं!
• एकीकडे मुस्लिम मतदारांच्या मनातील हिंदुत्व आणि भाजपाबद्दलचा राग शमवण्याचा प्रयत्न करतानाच हिंदुत्ववादी सामान्य कार्यकर्त्यांनाही समंजसपणा शिकवण्याचा प्रयत्न आहे.
• भाजपाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनातही हिंदुत्वाबद्दल असलेल्या चुकीच्या कल्पनांना दूर सारत बेरीजही आवश्यक असल्याचे समजवण्याचे काम भागवतांच्या भाषणामुळे घडू शकते.
• गोमाता पूजनीय, भारत हे हिंदूराष्ट्रच, पण झुंडबळी घेणे ही गुन्हेगारी, एवढं बजावल्यामुळे काय करणं चुकीचं हे निवडणुकीच्या काळात थेट राजकारणात नसलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यालाही थेट समजवलं गेलं असावं.
आणखी प्रयत्न गरजेचे असणार!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपाची वैचारिक गंगोत्री असल्याने सरसंघचालकांच्या भाषणातील मुद्द्यांना भाजपाचे कार्यकर्ते नेते महत्व देतील, अनुसरणही करतील. पण सर्वात मोठं आव्हान असणार ते भाजपाला आजवर मत देणाऱ्या शिया मुस्लिमांना सोबत राखण्याचं. तसेच इतर मतदारांच्या मनातील टोकाचा संताप शमवत किमान त्यांचं भाजपाविरोधातील एकाच पक्षासोबत ध्रुविकरण थांबवण्याचं. तसं करण्यात जर भाजपा यशस्वी ठरली तर २०२२च्या निवडणुकीत २०१७चं यश टिकवणं भाजपाला सहज शक्य जाईल. नाही तर काळ हा प्रतिकुलतेचा आहे. कोरोना संकटाच्या हाताळणीमुळे उघडी पडलेली कार्यक्षमता खूपच नुकसानीची ठरेल. तसेच पारंपरिक ब्राह्मण मतदारांच्या मनातही योगी आदित्यनाथांच्या कार्यशैलीमुळे तयार झालेला दुरावा दूर करण्यासाठी संघाला प्रयत्न करावे लागणार आहे. धर्माएवढंच जातीचंही वर्चस्व असलेल्या या राज्यात भाजपासाठी आगामी निवडणूक सोपी नाही, एवढं नक्की.
तुळशीदास भोईटे मुक्तपीठचे संपादक आहेत. संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite
हेही वाचा: “सर्व भारतीयांचा डीएनए एकच! गाय ही पूजनीय, परंतु लिंचिंग करणारे गुन्हेगार!” – सरसंघचालक मोहन भागवत
“सर्व भारतीयांचा डीएनए एकच! गाय ही पूजनीय, परंतु लिंचिंग करणारे गुन्हेगार!” – सरसंघचालक मोहन भागवत