मुक्तपीठ टीम
सामाजिक,राजकीय चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आपापल्या संस्था,संघटना या मार्फत विविध कार्यक्रम सातत्याने करीत असतात. असे कार्यक्रम नीट-नेटके, यशस्वी आणि प्रभावी करण्यासाठी त्या त्या कार्यक्रमाचे डिझाईन करणे गरजेचे असते. हे ‘डिझायन’ कसे करावे? कार्यक्रमाचं सूत्रसंचलन ते आभार कसं असावं? बोलण्यातील भीती कशी घालवावी? प्रभावी भाषण कसं करतात? या सगळ्याचं तंत्र आणि मंत्र कोणता? सोशल मीडियाचा वापर कसा करावा??? याच सर्व प्रश्नांना घेवून मुंबई आणि चिपळूण मधील राष्ट्र सेवा दलातील कार्यकर्त्यांसाठी “कार्यक्रम आयोजन कार्यशाळा” सह्याद्रीच्या कुशीतील ‘प्रयोगभूमीत ‘ आयोजित करण्यात आली होती.
राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते आणि जेष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांनी ही कार्यशाळा सलग तीन दिवस घेतली. आपल्या दीर्घ अनुभवातून त्यांनी नव्याने हा सिलॅबस तयार केलाय. सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी अशा प्रकारची ही पहिलीच कार्यशाळा होती. भविष्यात सामाजिक, राजकीय चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी या कार्यशाळेचा प्रभावी उपयोगी होवू शकेल, यात वाद नाही.
शुक्रवार दिनांक १९ नोव्हेंबरच्या रात्री दहा वाजता या शिबिराला सुरुवात झाली आणि रविवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता त्याची सांगता करण्यात आली. कृती-प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शिबिरार्थीनी या सगळ्याचा अनुभव घेतला. सहभागींचा उत्साह ओथंबून जात होता.
या कार्यशाळेतच सकाळी सह्याद्री भ्रमण, कोळकेवाडी धरणातील बॅक वॉटर पाहणी, इथल्या आदिम समाजाचं संगीत, नृत्य, इथली लोकगीते यातही शिबिरार्थी सहभागी झाले.
विचाराला कृतीची जोड देणारी, राष्ट्र सेवा दलाची ” कार्यक्रम आयोजन कार्यशाळा”
—————————————–सामाजिक,राजकीय चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आपापल्या संस्था,संघटना या मार्फत विविध कार्यक्रम सातत्याने करीत असतात. #RashtraSevaDal #RSD #RSDMumbai pic.twitter.com/BYNBGyB0LR
— Rashtra Seva Dal (@RashtraSevaDal1) November 23, 2021
या कार्यशाळेत अधिकतर मुलींचा सहभाग होता. कार्यशाळेमार्फत नवी उत्साही कार्यकर्यांची टीम सेवा दलाला मिळाली. चाकोरीबद्ध शिबिरांपेक्षा वेगळा दृष्टीकोन देणारा, विचारांना चालना देणारा, स्वतःला पडलेले प्रश्न स्वतः सोडवत पुढे जाणारा नवा कार्यकर्ता या निमित्ताने जोडला जाईल हीच या शिबिराची उपलब्धी…
राष्ट्र सेवा दल,मुंबईने या अगोदर नाईट आऊट शिबीर, वर्षा सहलीनिमित्त भात लावणी किंवा जंगलवृद्धीकरता वृक्षरोपण उपक्रम केले आहेत. आता ‘कार्यक्रम आयोजन कार्यशाळा’ अशी आगळी कार्यशाळा यशस्वी केली आहे..
या कार्यशाळेचे आयोजन राष्ट्र सेवा दल,मुंबईचे कार्याध्यक्ष शरद कदम, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे सेक्रेटरी राजन इंदुलकर आणि प्रयोग भूमीच्या सहकार्याने केले होते……