मुक्तपीठ टीम
ग्वाल्हेरमध्ये ५७वर्षांची परंपरा तुटली आहे. सातत्यानं ग्वाल्हेरमध्ये जनसंघाच्या पणतीपासून भाजपाच्या कमळापर्यंत विजयच होत आला होता. पण काँग्रेसच्या २२ आमदारांना फोडून काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदेंनी कमळ हाती घेतले. तरीही बालेकिल्ल्यातच भाजपाचा पराभव झाला आहे. आरपीआयच्या खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ग्वाल्हेरमधील शिंदेंच्या पराभवाकडे लक्ष वेधलं आहे. जनता बंडखोरांना माफ करत नाही, महाराष्ट्रातही ग्वाल्हेरसारखंच घडणार आहे, असा इशारा खरात यांनी दिला आहे.
ग्वाल्हेरमध्ये काँग्रेसला विजय मिळाला आहे. तब्बल ५७ वर्षानंतर ग्वाल्हेर आणि २३ वर्षानंतर जबलपूरमध्ये काँग्रेस पक्षाचा महापौर निवडून येत आहे.ग्वाल्हेरमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांचं चांगलं वर्चस्व आहे. त्यांच्या होम ग्राउंडवर काँग्रेसचा उमेदवार महापौर होत असल्याने शिंदेंसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय.
आरपीआयच्या खरातांची टीका
ज्योतीरादित्य शिंदे यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जनतेने घरात बसवलं त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब जनता बंडखोरांना विसरत नाही तुम्हाला सुद्धा येणाऱ्या ठाण्यातील महापालिकेच्या निवडणुकीत घरी बसवणार अशी टीका आरपीआयच्या खरात गटाचे सचिन खरात यांनी केली आहे.
मध्यप्रदेश मधील काँग्रेस पक्षाचे २२ आमदार फोडून ज्योतीरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून २०२० मध्ये भाजपा पक्षात प्रवेश केला. परंतु त्यांच्याच होमटाऊन मध्ये म्हणजे ग्वाल्हेर येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकित जनतेने त्यांना घरी बसवले. यातून स्पष्ट दिसून येत आहे की जनता बंडखोरांना माफ करत नाही. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा महाराष्ट्र राज्यात शिवसेनेचे ४० आमदार फोडले आणी मुख्यमंत्री झाले हे महाराष्ट्र राज्यातील जनतेने पाहिलं आहे. त्यामुळे ठाण्यातील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनासुद्धा जनता घरी बसविणार, अशी टीका खरात यांनी केली आहे.
पराभवाची कारणं!
- प्रत्यक्षात भाजपाच्या महापौरपदाच्या उमेदवाराच्या तिकीट वाटपाबाबत अनेक बैठका झाल्या.
- मध्य प्रदेशातील सर्व महापालिकांचे महापौरपदाचे उमेदवार भाजपाने निश्चित केले, मात्र ग्वाल्हेर महापालिकेच्या महापौरपदाच्या उमेदवाराला अखेरचे तिकीट देण्यात आले.
- केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यातील वाद हे त्यामागचे कारण असल्याचे सांगण्यात आले.
- ज्योतिरादित्य सिंधिया यांना महापौरपदाचा उमेदवार ठरवायचा होता, पण नरेंद्र सिंह तोमर यांना ते मान्य नव्हते.
- नंतर जेव्हा सुमन शर्मा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली तेव्हा नरेंद्र सिंह तोमर यांचे म्हणणे मान्य करण्यात आले आणि शिंदे
- यांचे म्हणणे पक्षाने ऐकून नाही घेतले.
- तेव्हापासून शिंदे छावणीत खळबळ उडाली होती.
- मात्र ज्या पद्धतीने त्यांच्या इच्छित महापौरपदाच्या उमेदवाराचे तिकीट जाहीर झाले नाही, त्याची कुठेतरी भाजपाला किंमत मोजावी लागेल, असे वाटत होते. आता निकालही सर्वांसमोर आहे.
भाजपाच्या काही नेत्यांनी केली बंडखोरी!!
- भाजपाच्या बंडखोर नेत्यांनीही भाजपाचे गणित बिघडवले.
- ग्वाल्हेरमधील महापालिका निवडणुकीत नगरसेवक उमेदवारांना तिकीट वाटपावरून भाजपाच्या अनेक नेत्यांनी बंडखोरी केली.
- त्यांनी भाजपाविरोधातच आघाडी केली होती.
- त्यांनी भाजपाच्या नगरसेवकांच्या विरोधात निवडणूक तर लढवलीच शिवाय भाजपाच्या महापौरपदाच्या उमेदवाराविरोधातही उग्र वातावरण निर्माण केले.
- त्यामुळे भाजपाचे महापौरपदाचे उमेदवार हरले.