मुक्तपीठ टीम
नॅशनल हेराल्ड संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी सुरु आहे. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. इतकंच नाही तर कुटुंबही यावेळी एकत्र दिसत आहे. प्रियंका गांधी आपल्या भावाच्या घरी पोहोचल्या आहेत, तर राहुल गांधी यांचे भाऊजी रॉबर्ट वाड्रा यांनीही ट्विट करून राहुल गांधींचे सांत्वन केले आहे. मलाही ईडीने अनेक समन्स बजावले होते, पण मी सर्वांची उत्तरे दिली. मला विश्वास आहे की सत्याचा विजय होईल, असे ते म्हणाले.
रॉबर्ट वाड्रा यांची भावनिक पोस्ट!
- राहुल गांधी यांच्या ईडीसमोर हजर होण्यापूर्वी, रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी राहुल गांधी सर्व निराधार आरोपातून मूक्त होतील, असे म्हटलं आहे.
- मला ईडीने १५ वेळेस समन्स बजावला आहे, प्रत्येकवेळी मी ईडीसमोर जाऊन त्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
- मी माझ्या पहिल्या कमाईपासून आतापर्यंत ईडीसमोर २३,००० पेक्षा जास्त कागदपत्रे सादर केली आहेत.’
- ‘मला विश्वास आहे की, विजय सत्याचा होणार.
- सरकार दडपशाहीच्या पद्धतीने देशातील जनतेला दडपून टाकू शखत नाही.
- आपल्या सर्वांना मजबूत व्हावे लागेल.
- आम्ही इथेच आहोत, प्रत्येक दिवस सत्यासाठी लढायचे आहे.
- देशातील जनता आमच्या पाठीशी उभी आहे.
झुकणार नाही, घाबरणार नाही…सत्याचा लढा सुरूच राहिल! – सुरजेवाला
- पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही दावा केला की, दिल्ली पोलिसांनी काल रात्रीपासून कारवाई सुरू केली आहे.
- दिल्लीचे छावणीत रूपांतर झाले आहे.
- हजारो कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले असून आमच्या अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
- नवी दिल्ली परिसरात मोदी सरकारने अघोषित आणीबाणी लागू केली आहे.
- मोदीजी जाणून घ्या, सत्याग्रह कोणीही रोखू शकत नाही.
- आम्ही झुकणार नाही, आम्ही घाबरणार नाही.
- हा सत्याचा लढा आहे.
- हा लढा सुरूच राहील.”