मुक्तपीठ टीम
तारखांवर तारखा. आपल्याकडे नेहमीचाच डायलॉग. पण काही वेळा अपवादही घडतात. राजस्थानमधील झुंझुनूची घटना अशीच. तेथे एका नराधमाने पाच वर्षाच्या एका चिमुरडीवर बलात्कार केला. या गुन्ह्याबद्दल त्याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. घटनेनंतर अवघ्या २६ दिवसांत सुनावणी झाली आणि निकालसुद्धा लागला. पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीशांनी शिक्षा देताना बजावले की, सुनावणीच्या वेळी या नराधमाला कोणताही पश्चात्ताप झालेला दिसला नाही, जर याला पश्चात्ताप झाला असता तर कदाचित दुसरी शिक्षा देण्यात आली असती.
राजस्थानातील पिलानी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १९ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पाच वर्षीय चिमुरडी ही आपल्या भावंडांसह शेतामध्ये खेळत होती. दरम्यान, आरोपी सुनील कुमार (वय २०) स्कूटीवर आला आणि त्या निर्दोष मुलीचे अपहरण केले. कोर्टाच्या निर्णयानंतर मुलीच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, “आज आमच्या मुलीला न्याय मिळाला आहे. या घटनेनंतर ती मौनात गेली आहे. तिला या कृत्त्यातून जीवनभरासाठी वेदना मिळाल्या आहेत. ज्याची वेदना कमी होऊ शकत नाही.”
१९ फेब्रुवारी रोजी अपहरणानंतर चिमुरडीच्या भावंडांनी आरोपीचा पाठलाग केला पण त्यांना पकडता आले नाही. यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस अधीक्षक मनीष त्रिपाठी यांच्या सूचनेवरून पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केली. दरम्यान, रात्री आठच्या सुमारास चिमुरडी गाडाखेडा गावात बेशुद्धावस्थेत आढळली. तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला जयपूरला नेहण्यात आले.
घटनेच्या पाच तासानंतर पोलिसांनी शाहपूरमधून आरोपी सुनीलला अटक केली. पोक्सो कोर्टाचे न्यायाधीश सुकेश कुमार जैन यांनी आरोपी सुनीलला फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणात, ४० हून अधिक साक्षीदार न्यायालयासमोर आले. सुमारे २५० कागदपत्रे पुरावे म्हणून मांडली गेली. लवकरात लवकर आरोप पत्र सादर करण्यासाठी पोलिसांनी याप्रकरणी दररोज १२ ते १३ तास काम केले आणि दहा दिवसातच आरोप पत्र सादर केले.
पोक्सो कायदा अस्तित्त्वात आल्यानंतर झुंझुनूंमधील बलात्कार करणाऱ्याला फाशी देण्याचे हे दुसरे प्रकरण आहे. तीन वर्षांपूर्वी अशाच एका प्रकरणात आरोपी विनोद कुमारला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. हा निर्णय घटनेच्या २९ दिवसात घेण्यात आला होता.
या निकालानंतर झुंझुनूंचे एसपी मनीष त्रिपाठी म्हणाले की, “या निर्णयामुळे अशा समाजातील नराधमांना यातून कडक संदेश मिळेल. त्यांनी या प्रकरणातील तपास अधिकारी चिडावा डीएसपी सुरेश शर्मा आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, या टीमने अवघ्या ९ दिवसात आरोप पत्र सादर करून नवीन विक्रम केला.”
पाहा व्हिडीओ: