मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या या भयावह परिस्थिती गेल्यावर्षी देशात लॉकडाऊन लावण्यात आले. त्यामुळे अनेकांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले. कोरोनामुळे ऑनलाईन वर्ग भरवणाऱ्या शाळांनी फी मध्ये कपात करावी अशा सुचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी शिक्षण विभागाच्या अख्यत्यारितील कनिष्ठ महाविद्यालये तसेच राज्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील फी ५० टक्के कमी करावी अशी मागणी केली आहे. त्यांनी ही मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,उच्च तंत्र शिक्षण मंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे ई-मेल द्वारे पत्र पाठवून केली. यापूर्वी त्यांनी खाजगी शाळांकडून आकारण्यात येणाऱ्या मनमानी फी मध्ये ५० टक्के कपात करावी अशी मागणी केली होती.
शालेय शिक्षण विभागाच्या अख्यत्यारितील कनिष्ठ महाविद्यालये तसेच राज्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील फी ५० टक्के कमी करावी, ही मागणी करताना अॅड अमोल मातेले यांनी सर्वोच्च न्यायालयाने देशातील कोरोना आणीबाणीच्या परिस्थितीचा विचार करून शालेय शुल्क (फी) १५ टक्के कमी करण्याच्या निकालाचा दाखला दिला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने याआधीच राज्यातील शाळांची फक्त फी १५ नव्हे तर ५० टक्के कमी करावी, अशी आग्रही मागणी केली आहे. आता याच धर्तीवर शालेय शिक्षण विभागातंर्गत चालवणारी जाणारी कनिष्ठ महाविद्यालये तसेच उच्चतंत्र शिक्षण विभागाच्या अख्त्यारितील कॉलेजांची फी देखील ५० टक्के कमी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अॅड अमोल मातेले यांच्या मते, कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत शाळा, कॉलेजात शिक्षण घेणार्या आपल्या पाल्याची फी कशी व कुठून भरावी, असा यक्षप्रश्न पालकांपुढे आहे. गेल्या वर्षभरापासून लॉकडाउनने अनेकांच्या रोजगारावर गदा आणली आहे. अनेक जण वर्क फ्रॉम होम करत असले तरी पगार अर्धा येत असल्याने महिन्याचे घरखर्च व इतर खर्च भागवतांना प्रत्येकाची पंचाईत होत आहे. शाळा कॉलेज बंद असल्याने कोरोना महामारीत ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली पालकांकडून फी वसुली सुरू आहे, हे कुठेतरी थांबले पाहिजे, असे त्यांनी ठासून सांगितले आहे. त्यामुळे कॉलेजांची फी देखील ५० टक्के कमी करून राज्य सरकार कोरोना परिस्थितीत गांजून गेलेल्या जनतेला दिलासा द्यावा, अशी त्यांनी मागणी केली आहे.